बंगळुरूत एअर इंडियाच्या विमानाला ‘टेल स्ट्राइक’

लँडिंगवेळी विमानाचा मागील भाग धावपट्टीला घासला; १७९ प्रवासी सुरक्षित

बंगळुरूत एअर इंडियाच्या विमानाला ‘टेल स्ट्राइक’

दिल्लीहून बंगळुरूकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानासोबत घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे विमान सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एअर इंडियाचे एआय-२६५१ हे विमान बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना ‘टेल स्ट्राइक’ची घटना घडली. लँडिंगदरम्यान विमानाचा मागील भाग धावपट्टीला घासल्याने काही क्षण प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वैमानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान एअरबस ए-३२१ प्रकारातील होते. दिल्लीहून बंगळुरूकडे येत असताना लँडिंगच्या अंतिम टप्प्यात अचानक परिस्थिती बदलली. त्याचवेळी धावपट्टीवरून एका मोठ्या वाइड-बॉडी विमानाने उड्डाण केल्यामुळे वातावरणात तीव्र ‘वेक टर्ब्युलन्स’ निर्माण झाली. या हवेच्या दाबामुळे एअर इंडियाच्या विमानाला अचानक झटका बसला. परिस्थितीचा अंदाज घेत वैमानिकांनी तातडीने ‘गो-अराउंड’ प्रक्रिया सुरू केली. मात्र, याचवेळी विमानाचा शेपटीचा भाग धावपट्टीला स्पर्श झाल्याने ‘टेल स्ट्राइक’ची घटना घडली.
हे ही वाचा:
शेअर बाजार घसरला; गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा चिंता

ट्रम्प यांच्या विधानाने कच्च्या तेलाच्या बाजारात खळबळ

सोन्या-चांदीच्या दरात घसरण

टागोरांचे पुस्तक ते लोकटक टी; स्वीडनच्या पंतप्रधानांना मोदींनी काय दिल्या भेटवस्तू?

घटनेनंतर विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली. या विमानात सुमारे १७९ प्रवासी आणि कर्मचारी होते. कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी या घटनेने प्रवाशांची चांगलीच धडधड वाढली.

घटनेनंतर संबंधित विमानाला तातडीने सेवेतून बाजूला काढून त्याची सखोल तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. विमानाच्या मागील भागाला किती नुकसान झाले, याचा अंदाज तज्ज्ञांकडून घेतला जात आहे. ‘टेल स्ट्राइक’ ही विमान वाहतूक क्षेत्रातील गंभीर घटना मानली जाते. टेकऑफ किंवा लँडिंगदरम्यान विमानाचा मागील भाग धावपट्टीला लागल्यास विमानाच्या संरचनेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा घटनांनंतर विमानाची पूर्ण तपासणी केल्याशिवाय ते पुन्हा उड्डाणासाठी परवानगी दिली जात नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे देण्यात आली असून पुढील चौकशी सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांत एअर इंडियाशी संबंधित काही तांत्रिक घटनांची चर्चा सुरू असतानाच आता घडलेल्या या प्रकारामुळे विमान सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Exit mobile version