मॉस्को दौऱ्यावर अजित डोभाल; कोणत्या विषयांवर झाली चर्चा?

भारत- रशिया संबंधांना नवे बळ मिळण्याचे संकेत

मॉस्को दौऱ्यावर अजित डोभाल; कोणत्या विषयांवर झाली चर्चा?

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या अलीकडील मॉस्को दौऱ्याने भारत- रशिया संबंधांना नवे बळ मिळण्याचे संकेत दिले आहेत. संरक्षण, ऊर्जा, अवकाश संशोधन आणि सुरक्षा सहकार्य या महत्त्वाच्या क्षेत्रांतील भागीदारीचा आढावा घेण्यासाठी २८ मे रोजी त्यांनी रशियाचे प्रथम उपपंतप्रधान डेनिस मांटुरोव्ह यांची भेट घेतली. भारत आणि रशियामधील दीर्घकालीन ‘विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त सामरिक भागीदारी’ अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

दौऱ्यादरम्यान डोभाल यांनी रशियाच्या राष्ट्रीय अवकाश केंद्रालाही भेट दिली. जगातील पहिल्या महिला अंतराळवीर वेलेंटिना तेरेश्कोव्हा यांच्या नावाने उभारलेल्या या केंद्रात त्यांनी रशियाच्या अत्याधुनिक अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती घेतली. यामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली चार-टप्प्यांच्या द्रव इंधन रॉकेट इंजिनचे प्रदर्शन आणि प्रस्तावित रशियन ऑर्बिटल स्टेशनच्या बेस मॉड्यूलचा समावेश होता.

डोभाल यांनी रॉस्कोसमॉस संयुक्त उद्योग माहिती केंद्रालाही भेट दिली. या केंद्रातून रॉकेट आणि अवकाश उद्योगाशी संबंधित मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण व निरीक्षण केले जाते. भविष्यात रशियाच्या प्रस्तावित ऑर्बिटल स्टेशनचे संचालन आणि व्यवस्थापन याच केंद्रातून होणार आहे. या दौऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (ISS) कार्यरत असलेल्या रशियन अंतराळवीरांशी डोभाल यांनी साधलेला थेट संवाद. व्हिडिओ लिंकद्वारे झालेल्या या चर्चेत त्यांनी अवकाशातील जीवन, मानवी मेंदूवर होणारे परिणाम, स्पेसवॉकदरम्यान येणाऱ्या शारीरिक अडचणी आणि भारहीनतेच्या अनुभवांविषयी प्रश्न विचारले.

रशियन अंतराळवीरांनी सांगितले की, जड स्पेससूट घालून सूक्ष्म हालचाली करणे अत्यंत कठीण असते. तसेच भारहीनतेच्या परिस्थितीत मानवी शरीर आणि विचारप्रक्रियेत अनेक वेगळे बदल जाणवतात. यावेळी डोभाल यांना मानव अंतराळ मोहिमेच्या प्रारंभीच्या काळाशी संबंधित एक ऐतिहासिक वारसा असलेली Yuri Gagarin यांची प्रसिद्ध काळी ‘व्होल्गा’ कारही दाखवण्यात आली.

मात्र, डोभाल यांचा मॉस्को दौरा केवळ अवकाश सहकार्यापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी म्यानमारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टीन ऑंग संग यांच्यासोबतही द्विपक्षीय चर्चा केली. संरक्षण, सुरक्षा आणि प्रादेशिक संपर्क प्रकल्पांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची राजनैतिक पुढाकार मानली जात आहे. जुलै महिन्यात नवी दिल्लीत होणाऱ्या BIMSTEC राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी म्यानमारचे एनएसए भारतात येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

बकरी ईदनिमित्त बोलावून १७ वर्षीय हिंदू युवकावर केले चाकूने वार; तरुणाचा मृत्यू

आशिया- प्रशांत महासागरावर कोणतेही राष्ट्र वर्चस्व गाजवू शकत नाही!

कर्नाटकात २० लाख बेकायदा बांगलादेशी?

लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यात ११ जण ठार

मॉस्कोमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचादरम्यान डोभाल यांनी दहशतवादाविरोधातील भारताची ठाम भूमिका पुन्हा अधोरेखित केली. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत कोणत्याही प्रकारचे दुटप्पी धोरण स्वीकारले जाऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांचे समर्थन करायचे की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची, याबाबत जबाबदार देशांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जागतिक सागरी सुरक्षेच्या महत्त्वावर भर देताना होर्मुझ सामुद्रधुनी आणि लाल समुद्रासारख्या आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गांवरील वाहतूक सुरक्षित आणि अखंडित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Exit mobile version