मध्य सीरियातील पालमिरा शहरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तीन अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकन सैन्याने सीरियामध्ये इस्लामिक स्टेट गटाविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली आहे. पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
“१३ डिसेंबर रोजी अमेरिकन सैन्यावर झालेल्या हल्ल्याला थेट प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्याने आयसिसचे लढाऊ सैनिक, पायाभूत सुविधा आणि शस्त्रास्त्रे नष्ट करण्यासाठी सीरियामध्ये ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’ (OPERATION HAWKEYE STRIKE) सुरू केले,” असे हेगसेथ यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, क्रूर हल्ल्यानंतर अमेरिकेने लगेचच म्हटले होते की, जर तुम्ही अमेरिकन लोकांना लक्ष्य केले अगदी जगात कुठेही तर, तुम्ही तुमचे उर्वरित आयुष्य हे चिंतेत घालवाल की अमेरिका तुमचा शोध घेईल आणि निर्दयपणे मारेल.
मध्य सीरियातील पालमिरा शहरात एका संशयित इस्लामिक स्टेट हल्लेखोराने अमेरिकन आणि सीरियन सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर काही दिवसांनी ही कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एक नागरिक दुभाषी ठार झाले, तर तीन इतर अमेरिकन सैनिक जखमी झाले. अमेरिकन सैन्याच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराला नंतर गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे हल्ले आयएसच्या तळांवर लक्ष्यित आहेत. त्यांनी सीरियाचे अध्यक्ष अहमद अल-शारा यांना पाठिंबा दर्शविला, जे दहशतवादी गटाला लक्ष्य करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी इशारा देत म्हटले आहे की, जर कोणत्याही प्रकारे अमेरिकेवर हल्ला केला किंवा धमकी दिली तर संपवले जाईल.
हे ही वाचा..
जम्मू- काश्मीर: किश्तवाड जिल्ह्यामधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्याशी संबंध
भारतातील सर्वाधिक पसंती मिळालेल्या १० ट्विटपैकी आठ ट्विट पंतप्रधान मोदींचे
बांगलादेशात टागोरांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्थापन झालेले ‘छायानौत’ भस्मसात
अमेरिकेतील ग्रीन कार्ड लॉटरी कार्यक्रम स्थगित; कारण काय?
एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, मध्य सीरियातील ज्या भागात आयएसची पायाभूत सुविधा आणि शस्त्रे आहेत अशा ७० ठिकाणी हल्ला करण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा हल्ला F-15 ईगल जेट्स, A-10 थंडरबोल्ट ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट आणि AH-64 हेलिकॉप्टर वापरून करण्यात आला. जॉर्डनचे F-16 लढाऊ विमान आणि HIMARS रॉकेट तोफखाना देखील वापरण्यात आला.







