गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि अनेक रक्तरंजित गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेला अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार करण्यात आला आहे. भारताकडून सुरू असलेल्या प्रत्यार्पण प्रक्रियेदरम्यान अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने त्याला १८ नोव्हेंबर रोजी देशाबाहेर पाठवले. या कारवाईची अधिकृत माहिती माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या पुत्र झिशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे देण्यात आली असून त्याचा स्क्रीनशॉटही झिशानने शेअर केला आहे. बुधवारी सकाळी तो भारतात येणार असल्याचे कळते.
अनमोल बिश्नोईवर ऑक्टोबर २०२४ मध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे मे २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येतही तो महत्त्वाचा सूत्रधार मानला जातो. एप्रिल २०२४ मध्ये सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणीही त्याची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी आहे.
हे ही वाचा:
आर. माधवनचा काय आहे लुक टेस्टचा किस्सा ?
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकी यांना अटक
दोन गटांत फुटलेली काँग्रेस राहुल गांधींना वाचवण्यात गुंतली
बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या विविध गुन्ह्यांमुळे महाराष्ट्र न्यायालयाने अनमोलविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही बजावली होती. अनमोलला गेल्या वर्षी अमेरिकेत अटक झाली होती, मात्र ती भारतातील गुन्ह्यांसाठी नव्हे तर अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश केल्यामुळे. त्यानंतर भारताने प्रत्यार्पणासाठी पाठपुरावा सुरू केला होता.
सिद्धू मूसेवाला हत्याकांडात गोल्डी ब्रारने खुलासा करताना ही हत्या अकाली दल नेते विकी मिद्दुखेरा यांच्या खुनाचा बदला असल्याचे सांगितले होते. या प्रकरणात अनमोलचे नाव प्रथमच समोर आले. तसेच सलमान खान प्रकरणातील आरोपपत्रानुसार, अनमोलने हल्लेखोरांना नऊ मिनिटांचे भाषण देत “इतिहास घडवण्याचे” आवाहन केल्याचा आरोप आहे. बाबा सिद्दीकी हत्येतही हल्लेखोर अनमोलच्या सततच्या संपर्कात असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, बिश्नोई सिंडिकेटमध्ये गेल्या वर्षी मोठी फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. एकेकाळी जवळचे साथीदार असलेले गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई आता वेगवेगळ्या मार्गावर असून त्यांच्या गुन्हेगारी जाळ्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर भरकटलेली रचना तपास संस्थांसमोर नवे आव्हान बनली आहे. अनमोलच्या हकालपट्टीनंतर मूसेवाला व सिद्दीकी हत्याकांडातील महत्त्वाचे धागेदोरे उकलण्याची शक्यता तपासकर्त्यांनी व्यक्त केली आहे.







