अमेरिकेत दोन दिवसांपूर्वीचं प्रवासी विमान आणि हेलीकॉप्टर यांचा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली होती. यानंतर आता आणखी एक विमान अपघात घडला आहे. फिलाडेल्फिया विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एक विमान कोसळले. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात एका लहान मुलासह सहा जणांना घेऊन जाणारे एक लहान वैद्यकीय विमान क्रॅश झाले. वस्ती असलेल्या भागात हे विमान कोसळले आणि यामुळे परिसरातील अनेक घरांना आग लागली. फिलाडेल्फिया शहरातील एका शॉपिंग मॉलजवळ हे विमान अचानक क्रॅश झालं. हे विमान कोसळल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या वाहनांना आणि घरांना आग लागली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. या विमानात सहा जण होते.
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशननुसार (FAA), रुझवेल्ट मॉलजवळ शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. अपघातग्रस्त विमानातून सहा जण फिलाडेल्फियावरून मिसूरीला जात होते. यामध्ये दोन डॉक्टर, दोन पायलट, आणि आणखी दोन जणांचा समावेश होता. मात्र, हे विमान टेकऑफनंतर अवघ्या ३० सेकंदातच कोसळलं. विमान १६०० फूट उंचीवर गेल्यानंतर रडारवरून गायब झालं होतं. त्यानंतर काही क्षणात हे विमान कोसळलं आणि विमानाला भीषण आग लागली. उड्डाण डेटामध्ये असे दिसून आले की, विमानाने विमानतळावरून संध्याकाळी ६.०६ वाजता (स्थानिक वेळेनुसार) उड्डाण केले आणि १,६०० फूट उंची गाठताच सुमारे ३० सेकंदांनंतर रडारवरून गायब झाले. हे विमान मेड जेट्स म्हणून कार्यरत असलेल्या कंपनीकडे नोंदणीकृत होते.
हे ही वाचा :
फडणवीस-शिंदेना अडकवण्याचा डाव, SIT स्थापन!
राष्ट्रपतींवरील काँग्रेसची टिपण्णी म्हणजे देशातील १० कोटी आदिवासी बांधवांचा अपमान
असावा सुंदर चांदीचा बंगला, चंदेरी, सोनेरी लखलखता चांगला! काँग्रेस आमदाराची अफाट संपत्ती!
पूजा दानोळेच्या रूपेरी यशाने महाराष्ट्राला महिलांना विजेतेपद!
क्रॅश साइट ईशान्य फिलाडेल्फिया विमानतळापासून पाच किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. या विमानतळावर प्रामुख्याने व्यावसायिक जेट आणि चार्टर फ्लाइटचे उड्डाण होते. फिलाडेल्फियाच्या आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाने अपघाताचे वर्णन मोठी घटना म्हणून केले आहे. अपघात झाल्यानंतर तात्काळ अमेरिकेच्या स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, पोलीस, अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. तसेच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या आहेत.







