दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला (आप) मोठे दणके बसत असून पक्ष गळतीला सुरुवात झाली आहे. अवघे काही दिवस निवडणुकीच्या मतदानाला राहिले असून सत्ताधारी आप पक्षाच्या आठ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. आप पक्ष हा त्यांच्या प्रामाणिक विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप करत या आठ आमदारांनी पक्षाला राम राम ठोकला आहे.
आपचे आमदार गिरीश सोनी (मादीपूर), त्रिलोकपुरा येथील रोहित मेहरौलिया, मदन लाल (कस्तुरबा नगर), राजेश ऋषी (जनकपुरी), नरेश यादव (मेहरौली), भावना गौर (पालम), पवन कुमार शर्मा (आदर्श नगर) आणि बी एस जून (बिजवासन) यांनी पक्षापासून फारकत घेतली आहे.
मादीपूर मतदारसंघातील विद्यमान आमदार गिरिश सोनी यांनी पक्षातून बाहेर पडताना म्हटले आहे की, पक्षांतर्गत सुरू असलेल्या हालचाली आता बऱ्याच काळापासून टीकेचा विषय बनल्या आहेत. शीशमहाल सारखे मुद्दे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या सर्व प्रकरणांनी हैराण होऊन आम आदमी पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्या आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार रोहित कुमार मेहरौलिया यांनी दलित आणि वाल्मीकी समाजाच्या प्रगतीसाठी दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचे कारण देत पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजकीय फायद्यासाठी पक्षाने मागासवर्गीयांचे शोषण केले. कंत्राटी रोजगार संपविण्यास आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यास सरकारला अपयश आले, असा आरोप मेहरौलिया यांनी केला आहे.
कस्तुरबा मतदारसंघातील आमदार मदन लाल यांनी आमचा आप आणि राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचे म्हणत पक्षाला राम राम ठोकला आहे. तर, पालम मतदारसंघाच्या आमदार भावना गौर यांनी पक्षावारील विश्वास गमावला असल्याचे म्हणत आपला राजीनामा दिला आहे. जनकपुरी मतदारसंघातील आप आमदार राजेश ऋषी यांनीही सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत म्हटले आहे की, भ्रष्टाचारमुक्त कारभार, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मूलभूत तत्त्वांना पक्षाने त्यागले आहे. आदर्श नगर मतदारसंघातील आमदार पवन कुमार शर्मा यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, ज्या प्रामाणिक विचारसरणीच्या आधारावर पक्षाची स्थापना करण्यात आली होती त्यापासून ते दूर गेले आहेत. आम आदमी पार्टीची दुर्दशा पाहून मला खूप वाईट वाटत आहे. बिजवासन मतदारसंघाचे आमदार बी एस जून यांनीही पक्षातील लोकशाही संपल्याचे म्हणत राजीनामा दिला आहे.
हे ही वाचा :
फडणवीस-शिंदेना अडकवण्याचा डाव, SIT स्थापन!
राष्ट्रपतींवरील काँग्रेसची टिपण्णी म्हणजे देशातील १० कोटी आदिवासी बांधवांचा अपमान
असावा सुंदर चांदीचा बंगला, चंदेरी, सोनेरी लखलखता चांगला! काँग्रेस आमदाराची अफाट संपत्ती!
दरम्यान, आमदारांनी केलेले आरोप आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या रीना गुप्ता यांनी फेटाळले आहेत. या आमदारांनी जनसेवेकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असून पक्षावर निरर्थक आरोप केले आहेत, असं त्या म्हणाल्या.