अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी पाकिस्तानचे कौतुक केल्यानंतर आता अमेरिकेतील रिपब्लिकन सिनेटर्सनी पाकिस्तानच्या मध्यस्थी भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमेरिका- इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि कतार यांनी वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, अंतिम कराराच्या तांत्रिक चर्चेदरम्यान काही अमेरिकन खासदारांनी पाकिस्तान आणि कतार यांची विश्वासार्हता संशयास्पद असल्याचा दावा केला आहे.
अमेरिका-इराण संघर्ष संपवण्यासाठी झालेल्या चर्चेनंतर गेल्या आठवड्यात युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोन्ही पक्षांचे “राजकीय तोडगा काढण्याच्या वचनबद्धतेबद्दल” आभार मानले होते. तथापि, अमेरिकेतील काही रिपब्लिकन नेत्यांनी या प्रक्रियेत पाकिस्तानच्या सहभागावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
रिपब्लिकन सिनेटर रिक स्कॉट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये पाकिस्तान आणि कतार या दोन्ही देशांवर गंभीर आरोप केले. “आपले खरे मित्र कोण आहेत हे आता स्पष्ट झाले पाहिजे. कतार आणि पाकिस्तानचा दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा मोठा इतिहास आहे. ते अर्थपूर्ण शांततेपेक्षा इराणच्या दशकांपासून सुरू असलेल्या दहशतवादी मोहिमेला पाठिंबा देण्यात अधिक रस घेत असल्याचे दिसते,” असे स्कॉट यांनी म्हटले. त्यांनी पुढे सांगितले की, कोणताही करार झाला तरी त्यातून इराणला अण्वस्त्र विकसित करण्याची संधी मिळता कामा नये.
मोंटानाचे रिपब्लिकन खासदार टिम शीही यांनीही पाकिस्तानवर कठोर टीका केली. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानच्या भूतकाळातील भूमिकेचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केले. “आपण हे विसरू नये की पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला जवळपास एक दशक लपवून ठेवले होते. त्यांनी आयएसआयच्या माध्यमातून अयातुल्ला शासनाला निधी पुरवला आणि आमच्याविरोधातील बंडखोरीलाही मदत केली,” असा आरोप शीही यांनी केला. पाकिस्तान अशा परिस्थितीत निष्पक्ष मध्यस्थ ठरू शकतो, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचेही त्यांनी नमूद केले. टिम शीही यांनी वाटाघाटी प्रक्रियेत पाकिस्तान आणि कतार यांना स्थान दिले जात असेल, तर संयुक्त अरब अमिरात (यूएई), इस्रायल आणि सौदी अरेबिया यांनाही चर्चेत सहभागी करून घेतले पाहिजे, असे मत व्यक्त केले. “यूएई, इस्रायल आणि सौदी अरेबिया हे या प्रदेशातील अमेरिकेचे खरे मित्र आहेत. त्यामुळे अमेरिका या देशांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली पाहिजे,” असे ते म्हणाले.
रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी यापूर्वीही पाकिस्तानच्या मध्यस्थी भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली होती. मे महिन्यात त्यांनी पाकिस्तानला इस्रायलला अधिकृत मान्यता देण्याचे आवाहन करताना त्याच्या मध्यस्थी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. “मध्यस्थ म्हणून पाकिस्तानची भूमिका समस्याप्रधान आहे. इस्रायलविरोधातील त्यांची भूमिका आणि इराणशी असलेले संबंध चिंताजनक आहेत,” असे ग्रॅहम यांनी म्हटले होते.
हे ही वाचा:
एआयमुळे ओरॅकलने काढले वर्षभरात २१ हजार कर्मचारी
पाकिस्तानविरोधी आंदोलनासाठी पीओकेमध्ये शाळकरी मुले, महिला रस्त्यावर
कतारमधील भारतीयांच्या मृत्यूवर जयशंकर यांनी व्यक्त केला शोक
अरूप रॉय तृणमूलच्या अध्यक्षपदी; बंडखोर गटाचा दावा
अमेरिकन माध्यमांतील एका वृत्ताचा उल्लेख करत त्यांनी पाकिस्तानने इराणची लष्करी विमाने आपल्या हवाई तळांवर ठेवण्यास परवानगी दिल्याचा आरोपही केला. याबाबत अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि जॉइंट चीफ्सचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांच्याकडे त्यांनी स्पष्टीकरण मागितले होते. “जर पाकिस्तानने खरोखरच इराणच्या लष्करी मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आपल्या तळांवर इराणी विमाने ठेवली असतील, तर अशा देशावर मध्यस्थ म्हणून विश्वास ठेवता येणार नाही,” असे ग्रॅहम यांनी स्पष्ट केले.
