पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) सुरू असलेल्या स्वातंत्र्य आंदोलनाने आता अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूप धारण केले आहे. आंदोलनाच्या सलग १४ व्या दिवशी शाळकरी मुले आणि महिलांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. स्वातंत्र्याची मागणी आणि पाकिस्तानच्या कथित दडपशाहीविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण प्रदेशात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
रावलकोट येथील ईदगाह मैदान हे आंदोलनाचे मुख्य केंद्र बनले असून येथे ७० हजारांहून अधिक आंदोलक गेल्या ११ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करत आहेत. सोमवारी येथे मोठ्या संख्येने शाळकरी मुले हातात फलक घेऊन सहभागी झाली होती. “पाकिस्तानी सैन्य बाहेर काढा”, “आम्हाला मूलभूत हक्क हवे आहेत”, “आम्हाला मोफत शिक्षण हवे आहे”, “इंटरनेट सेवा सुरू करा” आणि “अन्नपुरवठा बंद करणे थांबवा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. विशेष म्हणजे १० ते १२ वर्षे वयोगटातील मुलांनीही स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्याने आंदोलनाचे स्वरूप अधिक व्यापक झाल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांच्या मते, वाढते राजकीय वर्चस्व, आर्थिक संकट आणि लष्करी हस्तक्षेप याविरोधातील संताप आता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.
रावलकोटपुरते आंदोलन मर्यादित न राहता ते आता अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पसरले आहे. सुधनोटी जिल्ह्यातील तरार खेल येथे शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांनी चौकात एकत्र येत स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. तर मंधोळे परिसरात महिलांनी मोठा मोर्चा काढून पाकिस्तान सरकार आणि सैन्याविरोधात घोषणाबाजी केली. महिलांच्या वाढत्या सहभागामुळे आंदोलनाला नवे बळ मिळाले असून ते आता केवळ राजकीय आंदोलन न राहता व्यापक जनआंदोलनात रूपांतरित होत असल्याचे चित्र दिसत आहे.
हे ही वाचा:
कतारमधील भारतीयांच्या मृत्यूवर जयशंकर यांनी व्यक्त केला शोक
अरूप रॉय तृणमूलच्या अध्यक्षपदी; बंडखोर गटाचा दावा
१५ जणांचा बळी घेणाऱ्या लखनौच्या इमारतीवर अनधिकृत बांधकामासंबंधी झाली होती कारवाई
‘बिनपाण्या’चा रोमांस वान्स-मुनीर यांचे पती, पत्नी और वो…
आंदोलनाचे प्रमुख आयोजक आणि आवामी ॲक्शन कमिटीचे नेते सरदार अमन खान यांनी ईदगाह मैदानावरील सभेत पाकिस्तानी सैन्याला थेट इशारा दिला. त्यांनी सांगितले की, जर सुरक्षा दलांनी दडपशाही सुरूच ठेवली तर पाकव्याप्त काश्मीरमधून सैन्याला बाहेर जाण्यास भाग पाडले जाईल. “जर काश्मिरी आपल्या भूमीत सन्मानाने राहू शकत नसतील, तर पाकिस्तानी सैन्यालाही येथे राहण्याचा अधिकार नाही,” असे ते म्हणाले. खान यांनी आपल्या भाषणात बंगाली, बलुच आणि पश्तून समाजावरील कथित अत्याचारांचाही उल्लेख करत काश्मिरी जनतेने आता आपल्या हक्कांसाठी निर्णायक लढा उभारल्याचे सांगितले.
सरकारला ३८ मागण्यांचे निवेदन
या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आवामी ॲक्शन कमिटीने पाकिस्तान सरकारला ३८ मागण्यांचे निवेदन सादर केले असून त्यासाठी २३ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास रावलकोट ते मुजफ्फराबाद असा एक लाखांहून अधिक लोकांचा भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते, या मोर्चाचा उद्देश मुजफ्फराबादमधील राजकीय सत्तेवर जनतेचे नियंत्रण प्रस्थापित करणे हा आहे.
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ५ जूनपासून प्रदेशातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संपर्क व्यवस्था आणि माहितीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. तसेच १४ जूनपासून अनेक प्रवेशद्वारांवर अन्नवाहू ट्रक रोखण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांमधील असंतोष वाढत आहे.







