दहशतवादविरोधी भारताची भूमिका सांगताना, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे कारण पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे दुसरा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत त्याला प्रत्युत्तर देईल. त्यांनी सीमापार दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताच्या नवीन दृष्टिकोनाची रूपरेषा दिली. जयशंकर यांनी नेदरलँड्सस्थित एनओएसला दिलेल्या मुलाखतीत पुनरुच्चार केला की, २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले.
एस जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील प्रदेशातील नऊ ठिकाणी दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. यामुळे चार दिवस तीव्र चकमकी सुरू झाल्या, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर केला गेला आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी लष्करी कारवाई थांबवण्याचे मान्य केले. ही कारवाई सुरूच आहे कारण त्या कारवाईत एक स्पष्ट संदेश आहे की, जर २२ एप्रिल रोजीच्या कृत्यांसारखी कृत्ये झाली तर त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल,” असे जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल सांगितले.
“जर दहशतवादी पाकिस्तानात असतील तर आम्ही त्यांना जिथे असतील तिथेच मारू. म्हणून, ऑपरेशन सुरू ठेवण्यात एक संदेश आहे परंतु ऑपरेशन सुरू ठेवणे म्हणजे एकमेकांवर गोळीबार करणे असे नाही. सध्या, लढाई आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर एकमत झाले आहे,” असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा..
भारत-पाक युद्धबंदीमध्ये अमेरिकेची भूमिका काय? एस जयशंकर यांनी केले स्पष्ट
किश्तवाडमध्ये अनेक अतिरेक्यांना घेराव
अमृत भारत स्टेशन योजना : माणसं नाही, रोबोट करतील अनाउंसमेंट!
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल जयशंकर म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष हा जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या अत्यंत क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे सुरू झाला होता. जिथे २६ पर्यटकांना धर्म विचारून ठार करण्यात आले. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या पर्यटनाला हानी पोहोचवणे आणि धार्मिक तेढ निर्माण करणे हा हल्ल्यामागचा हेतू होता. लष्कर-ए-तोयबा (एलईटी) ने निर्मित केलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या गटाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली. भारताने हल्लेखोरांची ओळख पटवली आहे आणि ते एलईटीशी जोडलेले आहेत. हल्लेखोरांची ओळख पटवली असून दहशतवादी गटांचे कमांड सेंटर माहित आहेत आणि हे काही गुपित नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद नियमितपणे प्रमुख दहशतवाद्यांची यादी प्रकाशित करत असते. याच ठिकाणी हल्ले करण्यात आले.”







