पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. तुरुंगात असताना त्यांच्या उजव्या डोळ्याची तब्बल ८५ टक्के दृष्टी कमी झाल्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. इम्रान खान सध्या रावळपिंडी येथील अडियाला कारागृहात बंद आहेत.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, खान यांना काही महिन्यांपासून उजव्या डोळ्याने अस्पष्ट दिसत असल्याची तक्रार होती. सुरुवातीला हा त्रास किरकोळ असल्याचे समजले जात होते, मात्र हळूहळू त्यांची दृष्टी झपाट्याने कमी होत गेली. अलीकडील तपासणीत त्यांच्या उजव्या डोळ्याची केवळ १५ टक्के दृष्टी शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना वाचन, चालणे आणि दैनंदिन कामकाज करताना अडचणी येत असल्याची माहितीही देण्यात आली.
हे ही वाचा:
AI साठीची स्वतंत्र सोशल मीडिया?
गोदानचा पहिला शो स्काय सिटीमध्ये सुपरहिट
टी२० विश्वचषकात मोहम्मद नबीवर आयसीसीची कारवाई
कानपूर लॅम्बोर्गिनी प्रकरणः पुरावे नसल्याचे कारण देत शिवम मिश्राची सात तासांत सुटका
हा अहवाल न्यायालयाने नियुक्त केलेल्या वकिलामार्फत सादर करण्यात आला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला तातडीने नेत्रतज्ज्ञांसह विशेष वैद्यकीय पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले. या पथकाने सविस्तर तपासणी करून निश्चित कालमर्यादेत अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, इम्रान खान यांना त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घेण्यास आणि आवश्यक असल्यास विशेष उपचार मिळवण्यास अडथळा येऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
इम्रान खान यांच्या पक्षाने कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. योग्य वेळी उपचार न दिल्यामुळेच त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कुटुंबीयांशी नियमित संपर्क साधण्यास अडथळे आणले जात असल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे, सरकारी सूत्रांनी मात्र सर्व सुविधा नियमानुसार दिल्या जात असल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणामुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. माजी पंतप्रधानांच्या आरोग्याविषयी निर्माण झालेली चिंता, कारागृहातील वैद्यकीय सुविधांबाबतचे प्रश्न आणि मानवाधिकारांचा मुद्दा यामुळे या घटनेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आता न्यायालयाच्या आदेशानंतर होणाऱ्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल काय सांगतो आणि पुढे कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.







