भारताच्या इथेनॉल-मिश्रित E20 पेट्रोलच्या निर्यातीवरून भारत आणि भूतानमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. भूतानने भारताकडून E20 पेट्रोल स्वीकारण्यास नकार दिल्याचा दावा करणारे वृत्त भारत सरकारने स्पष्टपणे फेटाळून लावले असले, तरी भूतानमधील ‘द भूतानीज’ या वृत्तपत्राने आपल्या बातमीवर ठाम राहत भूतान सरकारच्या व्यापार विभागाच्या अधिकृत पत्रव्यवहाराचा आधार असल्याचा दावा केला आहे.
नेमका वाद काय?
काही दिवसांपूर्वी भूतानमधील ‘द भूतानीज’ या वृत्तपत्राने भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) भूतानला E20 पेट्रोल पुरवण्याची ऑफर दिली होती, मात्र भूतानने ती नाकारल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर भारतातील E20 इंधनाच्या गुणवत्तेवर आणि त्याच्या वापरावर पुन्हा चर्चा सुरू झाली. मात्र भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने हे वृत्त “पूर्णपणे चुकीचे” असल्याचे सांगत, भारतीय तेल कंपन्यांनी भूतानला E20 पेट्रोल निर्यात करण्याचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, तसेच असा कोणताही अधिकृत प्रस्ताव सध्या अस्तित्वातही नाही, असे स्पष्ट केले. मंत्रालयाने नागरिकांना केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. (The Times of India)
भारत सरकारच्या स्पष्टीकरणानंतर काही तासांतच ‘द भूतानीज’चे संपादक तेनझिंग लामसांग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भूतानच्या व्यापार विभागाकडून मिळालेल्या लेखी उत्तराची प्रत सार्वजनिक केली. या पत्रात भूतान सध्या भारताकडून E20 पेट्रोल आयात करत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच तांत्रिक बैठकीदरम्यान भारतीय तेल कंपन्यांना पारंपरिक (सामान्य) पेट्रोलचा पुरवठा सुरू ठेवण्याची विनंती केल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे.
भूतानने कोणती कारणे दिली?
भूतानच्या व्यापार विभागानुसार, इथेनॉलयुक्त E20 पेट्रोलमध्ये पाणी शोषून घेण्याची (हायग्रोस्कोपिक) क्षमता अधिक असते. त्यामुळे इंधनात पाण्याचे मिश्रण होण्याचा धोका वाढतो आणि त्याचा इंधनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, भूतानमधील अनेक भूमिगत इंधन साठवण टाक्या जुन्या असून त्या E20 इंधन साठवण्यासाठी योग्य नाहीत. त्यामुळे अशा इंधनामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची आणि इंजिनमध्ये बिघाड होण्याची शक्यता असल्याची चिंता भूतानने व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
पावसाचा महाप्रलय! मुंबई-पुणे संपर्क तुटला
‘रेड अलर्ट’चा इम्पॅक्ट! मुंबईची गती मंदावली, लोकल-डबेवालेही थांबले
अंबादास दानवे जिंकले… पण महायुतीतून
बरे झाले, उद्धव ठाकरेंना श्रीरामाची आठवण झाली!
भारताची भूमिका कायम
भारत सरकारने मात्र पुन्हा स्पष्ट केले आहे की, भूतानला E20 पेट्रोल निर्यात करण्याचा कोणताही औपचारिक प्रस्ताव भारतीय तेल कंपन्यांनी दिलेला नाही. त्यामुळे “भूतानने भारताचा प्रस्ताव नाकारला” हा दावा चुकीचा असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
