उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीरामाचा मार्ग सोडला होता. म्हणूनच त्यांच्या पक्षाची ही स्थिती झाली. मला आनंद वाटतो की, उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीरामाची आठवण झाली, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या रविवारी झालेल्या रामरक्षा आंदोलनावर प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे यांनी दादरच्या हनुमान मंदिराजवळ हे आंदोलन केले होते. उद्धव ठाकरेंसह त्यांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते आणि जमलेले शिवसैनिक यांनी रामरक्षा, हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र म्हटले. अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरीचा निषेध करण्यासाठी आणि यानिमित्ताने भाजपावर टीका करण्यासाठी या आंदोलनाची घोषणा मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी केली होती. असे राज्यव्यापी आंदोलन करण्याचे त्यांनी आवाहन केले होते.
कुणालाच म्हणता येत नव्हती रामरक्षा
रामरक्षा आंदोलन घेतले असले तरी कुणालाही रामरक्षा म्हणता येत नव्हती, हे स्पष्ट दिसत होते. तिथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणाने रामरक्षा म्हटली आणि बाकीचे हात जोडून शांत उभे होते. नंतर मारुती स्तोत्र म्हणताना मात्र अनेकजण ते म्हणत असल्याचे दिसून आले.
या आंदोलनात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी प्लॅस्टिकच्या गदाही आणल्या होत्या. उद्धव ठाकरेंनाही गदा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आलेल्या सर्व कार्यकर्ते, शिवसैनिकांना गर्व से कहो हम हिंदू है लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. एकूण वातावरण हे भगवामय झाले होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होते की, इतक्या वर्षांनी उद्धव ठाकरेंच्या एका आंदोलनात किंवा सभेत जय श्रीरामच्या घोषणा कशा काय देण्यात आल्या.
रविवारी सायंकाळी हे आंदोलन संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी प्रभू श्रीरामाचा मार्ग सोडला होता. त्यामुळेच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. जर ते राममार्गाने चालले तर त्यांचे भले होईल. फक्त आजच्या दिवसापुरती नाही तर त्यांनी दररोज रामरक्षा म्हणावी, अशी माझी अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
सिंधू, सतलजचे पाणी रोखण्याची चीनची धमकी…
१२ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या
६१ वर्षीय आमिर खान तिसऱ्यांदा हिंदू स्त्रीशीच झाला विवाहबद्ध
सुवर्ण अक्षरांनी कोरला ‘१००’ चा विक्रम!
.हिंदू माफ करणार नाही
अयोध्यमध्ये झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडलं आहे, आम्ही भोळे, भाबडे हिंदू आहोत, पण मूर्ख नाही. कुणी मंदिर लुटत असेल तर हिंदू कधीही माफ करणार नाही, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच राम मंदिराला केलेलं सगळं दान कुठे गेलं असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हिंदुंचे पैसे लुटता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्हाला भाजपमुक्त राम हवाय. त्यामुळे आता राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावर उतरा. शिवसेनेने राम मंदिराला दिलेली चांदीची वीट कुठे गेली? राम रक्षा आंदोलन म्हणजे भर पावसात पेटलेली ठिणगी आहे. शिवसेना संपवण्याचा अफजलखानी विडा त्यांनी उचलाय. त्यामुळे या आंदोलनासाठी सर्वांनी आता एकत्र या, जोपर्यंत या चोरीचा निष्पक्षपातीपणाने निकाल लागला जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
जागे राहा, झोपू नका!
दरम्यान आता जी जाग आली आहे, ती जाग तशीच ठेवा, झोपू नका, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भर पावसामध्ये हे आंदोलन आज मुंबईमध्ये पार पडलं आहे. या आंदोलनाला ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.







