भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला असून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उध्वस्त केले आहेत. या मोहिमेत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करून टाकले आहेत. पाकिस्तानमधून हल्ल्याच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतानाचं आता भारताच्या या कारवाईवर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (Inter-Services Public Relations) च्या महासंचालकांनी प्रतिक्रिया देत हल्ल्याची पुष्टी केली आहे.
पाकिस्तानी लष्कराने सांगितले की, भारताने बुधवारी पहाटे देशाविरुद्ध हवाई हल्ले केले आणि या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असा इशाराही पाकिस्तानने दिला आहे. लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली आणि मुझफ्फराबाद आणि पंजाबमधील बहावलपूर येथे क्षेपणास्त्र हल्ले केले. काही काळापूर्वी, भारताने बहावलपूरच्या अहमद पूर्व भागातील सुभानुल्लाह मशिदीवर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे तीन ठिकाणी हवाई हल्ले केले, असे त्यांनी एआरवाय न्यूज चॅनेलला सांगितले.
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेला प्रतिसाद ‘तात्पुरता आनंद’ असल्याची प्रतिक्रिया अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे. त्यात ते पुढे म्हणाले की “याचा बदला कायमस्वरूपाच्या दुःखाने घेतला जाईल.” पाकिस्तान स्वतःच्या वेळेनुसार आणि ठरवलेल्या ठिकाणी या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. आमच्या हवाई दलाची सर्व विमाने हवेत उडतात. हा भ्याड हल्ला भारताच्या हवाई हद्दीतून करण्यात आला. त्यांना कधीही पाकिस्तानच्या हद्दीत घुसण्याची परवानगी नव्हती, असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाककडून नियंत्रण रेषेवर गोळीबार; तीन नागरिकांचा मृत्यू
ऑपरेशन सिंदूर: वायव्य भारतातील विमानतळे काही काळासाठी बंद
भारताचे ऑपरेशन सिंदूर सुरू, पाकव्याप्त काश्मिरातील ९ ठिकाणी भारतीय लष्कराने केला हल्ला
भारतासाठी असलेले पाणी भारतातच राहील, भारतच ते उपयोगात आणेल!
अहमद शरीफ चौधरी यांच्या मते, अहमदपूर पूर्व येथे झालेल्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला आणि १२ लोक जखमी झाले, तर कोटली येथे दोन नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानने आता ४८ तासांसाठी सर्व हवाई वाहतुकीसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.







