मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) दावा केला आहे की त्यांच्या हवाई दलाच्या एफ-35I ‘अदीर’ स्टेल्थ लढाऊ विमानाने इराणचे एक जेट पाडले आहे.
आयडीएफच्या निवेदनानुसार, हा हल्ला बुधवारी सकाळी तेहरानच्या आकाशात करण्यात आला. एफ-35I ‘अदीर’ विमानाने इराणी हवाई दलाचे याक-१३० लढाऊ जेट हवेतच पाडले. मानवी पायलट असलेल्या लढाऊ विमानाला एफ-35I ने पाडण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा करण्यात आला आहे.
आयडीएफने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले, “इराणी जेट पाडण्यात आले: एअरफोर्सच्या एफ-35I ‘अदीर’ फायटर जेटने इराणी एअर फोर्सच्या याक-१३० फायटर जेटला लक्ष्य करत हवेतच नष्ट केले. मानवी पायलट असलेल्या फायटर एअरक्राफ्टला एफ-३५ ‘अदीर’ने पाडण्याची ही ऐतिहासिक घटना आहे.”
तेहरानमध्ये याक-१३० प्रकारची विमाने साधारणपणे प्रशिक्षण आणि हलक्या लढाईसाठी वापरली जातात. मात्र सध्याच्या संघर्षात ड्रोन आणि क्षेपणास्त्र धोक्यांना सामोरे जाण्यासाठी त्यांची तैनाती करण्यात आल्याचे सांगितले जाते. गेल्या काही आठवड्यांत इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव तीव्र झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या लष्करी तळांवर आणि हवाई तळांवर हवाई हल्ले व क्षेपणास्त्र प्रहार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
हे ही वाचा:
रशियाकडून भारत आणि चीनला अधिक तेलपुरवठा करण्याची घोषणा
भारतीय सैन्य दलाला मिळणार ३०० ‘धनुष’ हॉवित्झर तोफा!
उपांत्य फेरीपूर्वी भारतीय क्रिकेटपटू श्री सिद्धीविनायक चरणी
हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली तर भारतासमोर ऊर्जा संकट?
‘ऑपरेशन रोरिंग लायन’च्या तिसऱ्या दिवशी, इस्रायलमधील आपत्कालीन वैद्यकीय सेवा संस्था एमडीए यांच्या पथकांना देशभरात विविध ठिकाणी पाठवण्यात आले. क्षेपणास्त्रांच्या प्रभावानंतर अनेक ठिकाणी मदतकार्य करण्यात आले.
एमडीए आणि पॅरामेडिक्सच्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये एकूण ६० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी एकाची प्रकृती सुधारत असून ५९ जण स्थिर आहेत. एमडीएच्या एकत्रित आकडेवारीनुसार आतापर्यंत ३६९ जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यात १० जणांचा मृत्यू झाला, २ जण गंभीर जखमी झाले, ५ जण किरकोळ जखमी झाले आणि ३५२ जणांना सौम्य दुखापत झाली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे प्रादेशिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







