इराण विरुद्ध इस्रायल असा संघर्ष आणखी तीव्र झाला असून इराणवर इस्रायलने हल्ले केले आहेत. यामुळे तेहरान, तब्रीझ आणि इस्फाहानमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना “प्रत्युत्तर देऊ नका” असे वारंवार सांगूनही इस्रायलकडून हे हल्ले करण्यात आले.
राजधानी तेहरानसह इराणमधील अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले, त्याचवेळी इस्रायलने लष्करी लक्ष्यांवर हल्ला केल्याचे सांगितले. या प्रदेशात ‘सर्व सूत्रे माझ्याच हातात आहेत’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना तेहरानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर न देण्याचे निर्देश दिले होते, असे असूनही हे हल्ले झाले. रविवारी रात्री इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर तेहरान आणि तेल अवीव यांच्यात धमक्यांची देवाणघेवाण झाली. ८ एप्रिलच्या शस्त्रसंधीनंतर दोन्ही बाजूंमधील हा पहिला थेट संघर्ष होता. बेरूतवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणने इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची मालिका डागली.
यापूर्वी, इराणने उत्तर इस्रायलवर १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या अधिकाऱ्यांनी याला, युद्धविराम लागू असूनही इस्रायलकडून दक्षिण लेबनॉनवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हटले आहे. अमेरिकेसोबत युद्धविराम करार झाल्यापासून इराणने इस्रायलवर थेट हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ होती. या ताज्या संघर्षांमुळे आता शांतता प्रयत्नांना मोठा फटका बसला आहे.
इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने इस्फहान, करज, तब्रीझ आणि तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त दिले, परंतु याबद्दल तात्काळ अधिक तपशील दिला नाही. या पार्श्वभूमीवर, इराणने देशातील मुख्य विमानतळ असलेल्या तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील हवाई क्षेत्र बंद केले. सध्या तरी, इराणी अधिकाऱ्यांनी कशावर हल्ला झाला किंवा झालेल्या नुकसानीबद्दल कोणताही तपशील दिलेला नाही. इराणच्या निमलष्करी रिव्होल्यूशनरी गार्डने म्हटले आहे की, इस्रायलने सोमवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात हवेतून डागण्यात येणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला, मात्र त्यांनी यावर अधिक स्पष्टीकरण दिले नाही.
हे ही वाचा:
‘महापौर असताना किशोरी पेडणेकरांनी केला टर्टल हॉटेल घोटाळा’
भारताचा जन्मदर घसरला; प्रजनन दर १.९ वर
मुंबई विमानतळावर ५ कोटीचे ३.२ किलो सोनं जप्त
सूर्यकुमारचे कर्णधारपद का गेले? तीन कारणे ठरली निर्णायक
दरम्यान, थोड्या वेळापूर्वी हल्ले सुरू झाल्यानंतर इस्रायली लष्कराने एक छोटे निवेदन जारी केले: “थोड्या वेळापूर्वी, इस्रायली हवाई दलाने पश्चिम आणि मध्य इराणमधील इराणी दहशतवादी राजवटीच्या लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला.” त्यात अधिक तपशील देण्यात आला नाही.
दरम्यान, व्हाईट हाऊसने या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी सांगितले होते की, इराणने क्षेपणास्त्रे डागणे थांबवून वाटाघाटीच्या टेबलावर परत यावे, अशी त्यांची इच्छा आहे. ते असेही म्हणाले की, रविवारी सकाळी लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेले हल्ले अमेरिकेच्या समन्वयाशिवाय झाले होते आणि “मी याबद्दल खूश नाही.”
