दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पहिल्यांदाच कबूल केले की, त्यांचा प्रमुख मसूद अझहरचे कुटुंबीय हे भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या हल्ल्यात मारले गेले. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, जैशचा एक टॉप कमांडर, मसूद इलियास काश्मिरी हा या माहितीची कबुली देत असल्याचे दिसत आहे. अशातच इलियास याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात तो अझहर याचा सहभाग दिल्ली आणि मुंबईतील हल्ल्यांच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना आश्रय देत नसल्याचा पाकिस्तानचा दावा फोल ठरला असून जगासमोर पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा उघड झाला आहे.
संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या जैशचा प्रमुख कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने एका व्हिडिओमध्ये कबूल केले आहे की, भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या अझहरने पाच वर्षांच्या तुरुंगवासानंतर भारताने सोडल्यानंतर पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. इलियास म्हणाला की, अझहरचा तळ बकालोट येथे होता, ज्यावर २०१९ मध्ये भारताने हवाई हल्ले केले होते.
“दिल्लीतील तिहार तुरुंगातून पळून गेल्यानंतर, अमीर-उल-मुजाहिदीन मौलाना मसूद अझहर पाकिस्तानात येतो. बालाकोटची माती त्याला त्याचे व्हिजन, ध्येय आणि कार्यक्रम पुढे नेण्यासाठी एक आधार देते. दहशत देणारा अमीर-उल-मुजाहिदीन मौलाना मसूद अझहर अशा प्रकारे समोर येतो,” असे इलियास म्हणताना ऐकू येत आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानकडे दहशतवाद न पोसण्याच्या दाव्याला महत्त्व उरलेले नाही.
इलियास याने पाकिस्तानच्या बालाकोटला अझहरच्या भारताविरुद्ध दहशतवाद पसरवण्याच्या मोहिमेचे मैदान म्हणून श्रेय दिले. शिवाय ओसामा बिन लादेनला विचारसरणीला आकार देणारा “शहीद” म्हणूनही संबोधले. इस्लामाबादने जगाला सांगितले होते की, त्यांच्या सीमेत कोणतेही दहशतवादी लपण्याचे ठिकाण नाही, तरीही पाकिस्तानच्या लष्करी-सुरक्षा देखरेखीखाली जैशचे कॅम्प मुक्तपणे कार्यरत होते या भारताच्या दीर्घकाळाच्या दाव्याला या कबुलीजबाबाने पुष्टी मिळते.
हे ही वाचा :
अभिनेता माधवन यांनी सांगितली मोदीजींच्या असाधारण लक्षवेधीपणाची गोष्ट!
सीबीआय न्यायालयाकडून कस्टम निरीक्षकासह दोघांना पाच वर्षांची शिक्षा
बॉम्बे हायकोर्टने ‘जॉली एलएलबी ३’ विरोधातील याचिका फेटाळली
मुरादाबादमध्ये पोलिस–पशुतस्करांमध्ये चकमक
यापूर्वी भारताच्या हल्ल्यात दहशतवादी संघटनेच्या झालेल्या नुकसानाची कबुली देताना इलियास दिसत आहे. ७ मे रोजी बहावलपूरमधील जामिया मस्जिद सुभान अल्लाह या जैशच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात अझहरच्या कुटुंबाचे तुकडे तुकडे झाले होते, असे काश्मिरी म्हणत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तान तसेच पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करत हल्ले केले. यावेळी मसूद अझहरचे नातेवाईक ठार झाले होते. त्यात त्याची बहीण, तिचा पती, पुतण्या, भाची आणि कुटुंबातील मुले यांचा समावेश होता. पाकिस्तानने हे मान्य केले नाही, परंतु आता जैश कडूनचं यावर शिक्कामोर्तब झाले आहे.







