इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान शांतता प्रस्तावाचा पहिला टप्पा मंजूर झाला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार बंधकांची सुटका होणार आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. यानंतर नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचीही माहिती समोर आली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. विशेष म्हणजे नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०- कलमी गाझा शांतता योजनेअंतर्गत युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेच्या करारावर चर्चा करणारी सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक थांबवली आणि पंतप्रधान मोदींशी संवाद साधला, असे वृत्त द टाईम्स ऑफ इस्रायलने त्यांच्या कार्यालयाचा हवाला देत दिले आहे. या संभाषणादरम्यान, पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल इस्रायली पंतप्रधानांचे अभिनंदन केले. सर्व ओलिसांच्या सुटकेसाठी झालेल्या कराराबद्दल पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान नेतन्याहू यांचे अभिनंदन केले, असे नेतन्याहू यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन करण्यासाठी माझे मित्र, पंतप्रधान नेतन्याहू यांना फोन केला. ओलिसांच्या सुटकेबाबतच्या कराराचे आणि गाझाच्या लोकांना वाढीव मानवतावादी मदतीचे आम्ही स्वागत करतो. जगात कुठेही कोणत्याही स्वरूपात किंवा प्रकटीकरणात दहशतवाद अस्वीकार्य आहे याची पुष्टी केली.” इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने पोस्ट केले की, “पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकतेच भारताच्या पंतप्रधानांशी बोलणे केले. सर्व ओलिसांच्या सुटकेसाठी झालेल्या कराराबद्दल नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नेतान्याहू यांचे अभिनंदन केले.”
हे ही वाचा :
झिशान सिद्दीकींना धमकी देणाराचं रिंकू सिंगकडे मागत होता ५ कोटी!
हनीट्रॅपचा सापळा! कोल्हापूरचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांना अडकविण्याचा प्रयत्न!
दक्षिण मुंबई हादरली ! २० वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर १७ नराधमांचा लैंगिक अत्याचार; दोघांना अटक!
बरेलीत जुम्मा नमाजसाठी कडेकोट बंदोबस्त; ४५०० हून अधिक पोलीस तैनात, २० महिला पथकं सज्ज!
तत्पूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी बुधवारी घोषणा केली की इस्रायल आणि हमास शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमत झाले आहेत, ज्यामुळे गाझामधील युद्ध युद्धबंदी कराराने संपेल. यामध्ये त्यांनी सांगितले की, ओलिसांना सोडण्यात येईल.
