माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना दक्षिण मुंबईत उघडकीस आली आहे. मानसिक रुग्ण असलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर तब्बल १७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोटदुखीमुळे तिला उपचारासाठी कामा रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी निदान केलं आणि या लैगिंग अत्याचाराचा पर्दाफाश झाला. पीडितेच्या तक्रारीनंतर कफ परेड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत एका अल्पवयीन मुलासह दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. इतर १५ नराधमांची ओळख पटवून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयाने कफ परेड पोलिसांना ही माहिती दिली. मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या या तरुणीला पोटदुखीमुळे दाखल करण्यात आले होते. तपासणीत ती गर्भवती आढळल्याने पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं आणि तात्काळ चौकशी सुरू केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं निष्पन्न झालं की, आरोपींनी पीडितेच्या मानसिक अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. पीडितेला स्पष्टपणे बोलता येत नसल्याने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांनी बाल हक्क आणि बाल संरक्षणासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मदत घेतली.
‘चित्रे आणि बाहुली’च्या मदतीने विश्वास संपादन
पीडिता प्रचंड घाबरलेली होती आणि कोणाशीही बोलण्यास तयार नव्हती. आरोपींनी तिला धमकावल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र, अनेकदा संवाद साधल्यानंतर, तसेच चित्रे आणि बाहुलीच्या बोटांचा वापर करून बोलल्यानंतर अधिकाऱ्यांनी पीडितेचा विश्वास संपादन केला.
या संवादानंतर पीडितेने वारंवार दोन आरोपींची नावे सांगितली. या दोघांमध्ये एक १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा आणि दुसरा ३२ वर्षांचा प्रौढ व्यक्ती आहे. पोलिसांनी तातडीने या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ६४ (२) (i) आणि ६४ (२) (के) (संमती देण्यास असमर्थ असलेल्या व मानसिक अपंगत्व असलेल्या महिलेवर बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली.
१७ जणांचा सहभाग; डीएनए अहवालावर पुढील कारवाई
पीडितेने अधिकाऱ्यांशी बोलताना काही जण तिला एकाकी ठिकाणी घेऊन जात आणि थंड पेये देत, अशी माहिती दिली. हे सर्वजण अटक केलेल्या दोन आरोपींशी संबंधित असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी प्रथमदर्शनी अनेकांनी लैंगिक अत्याचार केल्याचं स्पष्ट झालं असून, पोलिसांनी इतर १५ जणांनाही चौकशीसाठी बोलावून त्यांचे डीएनए नमुने घेतले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेच्या मानसिक अस्थिरतेचा फायदा घेऊन, तिला एकट्या ठिकाणी नेत आणि तिच्या घरी कोणी नसतानाही तिच्यावर अत्याचार करत होते. “त्यांनी तिला मद्ययुक्त पेये दिली आणि धमक्या दिल्या,” असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
हे ही वाचा :
बरेलीत जुम्मा नमाजसाठी कडेकोट बंदोबस्त; ४५०० हून अधिक पोलीस तैनात, २० महिला पथकं सज्ज!
फिलीपिन्समध्ये ७.६ तीव्रतेचा भूकंप!
बुरखा परिधान केल्यास भरा लाखोंचा दंड! इटलीच्या संसदेत विधेयक
आयपीएस वाय पूरन कुमार आत्महत्या प्रकरणी हरियाणाच्या दोन वरिष्ठ पोलिसांविरुद्ध गुन्हा
सध्या सर्व आरोपींचे आणि पीडितेच्या गर्भातील डीएनए नमुने पुढील तपासणीसाठी कलिना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पीडितेची गर्भधारणा संपुष्टात आणण्यात आली आहे. “आम्ही डीएनए अहवालाची वाट पाहत आहोत आणि त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेऊ,” असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या अहवालानंतर इतर आरोपींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अत्यंत दुर्देवी आणि संतापजनक असलेल्या या घटनेने महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.







