अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यापार युद्ध म्हणजेच टॅरिफ वॉर भडकले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी भारतावर टीका करत म्हटले की, भारत हा अमेरिकेच्या दबावापुढे झुकेल, माफी मागत रशियासोबतच्या व्यापार संबंधांवर करार करेल. लुटनिक यांच्या या वक्तव्याला काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शशी थरूर म्हणाले की, भारताने असे काहीही केलेले नाही की आम्ही माफी मागावी. जगभरातील इतर देश मॉस्कोसोबत मोठ्या प्रमाणात व्यवहार करत असताना नवी दिल्लीला का वेगळे केले जात आहे असा सडेतोड प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. “मला वाटत नाही की, आपण माफी मागण्यासारखे काही केले आहे. भारताने या सर्व बाबतीत खूप समजूतदार भूमिका घेतली आहे,” असे म्हणत थरूर यांनी लुटनिक यांचा दावा फेटाळून लावला आहे.
शशी थरूर यांनी अधोरेखित केले की, चीन, तुर्की आणि युरोप हे भारतापेक्षाही जास्त व्यापार हा रशियाशी करतात. “चीन भारतापेक्षा जास्त रशियन तेल आणि वायू खरेदी करतो. तुर्कीही जास्त रशियन तेल आणि वायू खरेदी करतो. युरोप तेल आणि वायू खरेदी करत नाही, परंतु इतर रशियन वस्तू खरेदी करतात, त्यामुळे ते भारतापेक्षा जास्त रक्कम गुंतवत आहेत,” असे थरूर म्हणाले. असे असताना फक्त भारतालाच का वेगळे केले जात आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा :
युवकांना रोजगाराशी जोडण्यासाठी मिशन मोडमध्ये योगी सरकार
पंजाबी फिल्म इंडस्ट्रीच्या ‘अमिताभ बच्चन’च्या वाट्याला एकटेपण
अक्षय कुमारने जुहू बीच स्वच्छ करून लोकांना दिला धडा
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी असे म्हटले की, भारत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करार करण्यासाठी वाटाघाटी करण्यासाठी परत येईल. एक-दोन महिन्यांत, भारत चर्चेसाठी येईल आणि माफी मागेल. त्यानंतर ट्रम्प भारताला माफ करतील आणि करार करण्याचा प्रयत्न करतील, असे लुटनिक म्हणाले. तसेच त्यांनी इशारा दिला की, नवी दिल्लीला जास्त काळ वॉशिंग्टनला आव्हान देणे परवडणारे नाही, लुटनिक यांनी भारताला दंडात्मक उपाययोजनांपासून वाचण्यासाठी तीन अटीही घातल्या आहेत. रशियन तेल खरेदी करणे थांबवा, भारतीय बाजारपेठ खुली करा आणि ब्रिक्सपासून दूर राहा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.







