अफगाणिस्तान सीमेवर संघर्ष करत असलेला पाकिस्तान सध्या कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. अशातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी भारताबाबत वक्तव्य करत लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले की, भारत सीमेवर कुरापती करण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान दोन आघाड्यांवर युद्धासाठी तयार असल्याचे ख्वाजा आसिफ म्हणाले.
मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांना पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीमुळे भारत सीमेवर “कृत्य” करू शकतो का अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, याची शक्यता आहे आणि ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यांनी काही महिन्यांपूर्वी भारतासोबत झालेल्या चकमकीची आठवण करून दिली. ज्यामध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांविरुद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या लष्करी संघर्षाचा उल्लेख होता आणि त्यावेळी पाकिस्तानी सैन्य अफगाण सीमेवरून हलवले गेले नव्हते असे त्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले की सध्या परिस्थिती फारशी चांगली नाही, पाकिस्तानच्या बिघडत्या सुरक्षा वातावरणाचा आणि अफगाणिस्तानसोबतच्या तणावाचा संदर्भ देत ते म्हणाले.
संरक्षण मंत्री म्हणून किंवा पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांशी संबंधित संभाव्य दोन आघाड्यांवर युद्ध यावर कोणत्याही बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले आहे का असे विचारले असता, आसिफ म्हणाले की त्यासाठी एक रणनीती तयार आहे. आम्ही सध्या त्यावर सार्वजनिकरित्या चर्चा करत नाही परंतु, आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत. याबद्दल कोणतीही शंका नाही, असे ते म्हणाले. भारत लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न करू शकतो या निराधार दाव्याची पुनरावृत्ती करत.
हे ही वाचा..
भंगार विक्रेत्याकडून लाच घेणारा पंजाबचा डीआयजी अटकेत
राहुरीचे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन
जगातील चांदी खेचून घेणारा हस्तर कोण?
“पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणताही फोन कॉल झालेला नाही!”
गेल्या आठवड्यात तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या भारत भेटीदरम्यान अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर संघर्ष सुरू झाला. मुत्ताकी यांनी भारताच्या सुरक्षा चिंता दूर करण्यासाठी काबूलमधील राजवट अफगाणिस्तानची भूमी परदेशांविरुद्ध वापरण्याची परवानगी देणार नाही असे म्हटले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्षामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की ही परिस्थिती इस्लामाबादच्या कृतींमुळे निर्माण झाली आहे.







