जम्मू- काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून शोक आणि संताप व्यक्त केला जात आहे. अशातच भारताकडून पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा ठळकपाने उपस्थित केला. तसेच पाकिस्तानवर सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि प्रदेश अस्थिर करण्याचा आरोप केला. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमधील हा सर्वात घातक हल्ला होता. या हल्ल्यात सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आणि यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.
न्यू यॉर्कमध्ये ‘व्हिक्टिम्स ऑफ टेररिझम असोसिएशन नेटवर्क’च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना, संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी, राजदूत योजना पटेल यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला आणि पाकिस्तानचे नाव न घेता, भारताविरुद्ध प्रचार आणि निराधार आरोप केल्याबद्दल त्यांच्या शिष्टमंडळाची कानउघाडणी केली. योजना पटेल यांनी भारताला ‘सीमापार दहशतवादाचा बळी’ असे संबोधले आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवादी गटांना पाठिंबा देण्याच्या पाकिस्तानच्या इतिहासाबद्दल दिलेल्या जाहीर कबुलीजबाबाकडेही लक्ष वेधले.
“पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि निधी देण्याचा पाकिस्तानचा इतिहास कबूल केला आहे आणि ही कबुली संपूर्ण जगाने ऐकली आहे,” असे योजना पटेल यांनी जगाच्या लक्षात आणून दिले. पुढे त्या म्हणाल्या की, पाकिस्तानच्या या उघड कबुलीजबाबाने कोणालाही आश्चर्य वाटले नाही. या जबाबातून पाकिस्तानला जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणारा आणि प्रदेश अस्थिर करणारा एक देश म्हणून उघड केले आहे, असे पटेल यांनी भारताच्या उत्तराच्या अधिकाराचा वापर करत म्हटले. याकडे जग आता डोळेझाक करू शकत नाही, असेही त्या पुढे म्हणाल्या.
गेल्या आठवड्यात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आणि संबंधित सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार सर्व देशांना या संदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी सक्रियपणे सहकार्य करण्याचे आवाहन केले.
हे ही वाचा..
“अल्लाहू अकबर”चे नारे देणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरची होणार एनआयए चौकशी
सलग पाचव्या दिवशी पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; कुपवाडा, बारामुल्लामधील चौक्या लक्ष्य
पाकिस्तानसमोर मोठा प्रश्न : नवाज यांनी पीएम शहबाजना काय सल्ला दिला?
“पाकिस्तानसोबत चर्चा नकोच! कारवाई करा…” पहलगाम हल्ल्यानंतर काय म्हणाले फारुख अब्दुल्ला?
दरम्यान, पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा दहशतवादी गटाचा भाग असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने हा हल्ला केल्याची जबाबदारी घेतली. यानंतर प्रत्युत्तरादाखल, भारताने अनेक राजनैतिक आणि सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या. १९६० सालचा सिंधू जल करार स्थगित करणे, अटारी येथील चेकपोस्ट बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क व्हिसा सूट योजना स्थगित करणे, पाकिस्तान नागरिकांना देश सोडून जाण्याच्या सूचना देणे, उच्चायुक्तालयांमधील राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे असे निर्णय भारताने घेतले.







