पाकिस्तानने स्वतःच्याचं भूमीवर हवाई हल्ला करून नागरिकांचा बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. यात लहान मुलांसह महिला ठार झाल्याची माहिती आहे. तालिबानच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करत असताना पाकिस्तान सैन्याने हल्ले केले यात सर्व सामान्य लोकांचे बळी गेले आहेत.
सोमवारी खैबर पख्तूनख्वाच्या तिरह खोऱ्यात पाकिस्तानी सैन्याने टीटीपीच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले. यावेळी पहाटे २ वाजता पाकिस्तानी हवाई दलाने पश्तून बहुसंख्य असलेल्या मात्रे दारा गावात JF- 17 लढाऊ विमानांमधून आठ LS-6 बॉम्ब टाकले. या हल्ल्यात किमान ३० लोक ठार झाले ज्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये प्रामुख्याने नागरिक होते. बचाव कार्य अजूनही सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
खैबर खोरे आणि खानकी खोऱ्याच्या मध्ये वसलेले, तिरह हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे. हल्ल्यात गावाचा मोठा भाग उध्वस्त झाला आहे. स्थानिक रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गावातील लोक झोपेत असताना मोठ्या स्फोटांचा आवाज ऐकू आला. बॉम्बस्फोट इतका तीव्र होता की गावाचा भाग पूर्णपणे उध्वस्त झाला. सर्वत्र ढिगारा उरला असून यामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळा येत होता.
हे ही वाचा :
ऑपरेशन सिंदूरनंतर सुरू केलेल्या ड्रोन वॉरफेअर स्कूलमधील पहिली बॅच लवकरच होणार पदवीधर
विनापरवानगी मिरवणुकीत “आय लव्ह मोहम्मद”चे नारे; जाब विचारायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला
नौशादने ‘आकाश’ बनून केलं लग्न अन् चार मित्रांसह महिलेवर केला सामुहिक बलात्कार
खैबर पख्तूनख्वा प्रांतात यापूर्वीही अनेकदा दहशतवादविरोधी कारवाया झाल्या आहेत. अनेकदा सामान्य नागरिकांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहे. खैबर पख्तूनख्वा पोलिसांच्या मते, या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान प्रांतात ६०५ दहशतवादी घटना घडल्या, ज्यामध्ये किमान १३८ नागरिक आणि ७९ पाकिस्तानी पोलिसांचा मृत्यू झाला. केवळ ऑगस्टमध्ये १२९ घटना घडल्या, ज्यामध्ये सहा पाकिस्तानी सैन्य आणि निमलष्करी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. हा परिसर दहशतवादी कारवायांचा केंद्रबिंदू राहिला आहे.







