भारत आणि जपान यांनी संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला ऐतिहासिक चालना देत पहिल्यांदाच संरक्षण सह-विकास (Defence Co-Development) करारावर स्वाक्षरी केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या १६ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. या बैठकीत संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमिकंडक्टर, आर्थिक सुरक्षा, ऊर्जा, महत्त्वाची खनिजे आणि मुक्त इंडो-पॅसिफिकसह विविध धोरणात्मक विषयांवरही सहमती झाली.
बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमधील आत्मीय संबंधही पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानाए ताकाइची यांचा उल्लेख “माझी धाकटी बहीण” असा करत दोन्ही देशांमधील विश्वास आणि मैत्री अधिक दृढ झाल्याचे सांगितले. ताकाइची यांच्या भारत दौऱ्याला विशेष महत्त्व असल्याचे नमूद करत, दोन्ही देशांतील संबंध केवळ सामरिक भागीदारीपुरते मर्यादित नसून ते परस्पर विश्वास, समान मूल्ये आणि दीर्घकालीन सहकार्यावर आधारित असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
या शिखर परिषदेतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे संरक्षण सह-विकास करार. या कराराअंतर्गत भारत आणि जपान संयुक्तपणे संरक्षण तंत्रज्ञान विकसित करणार असून, संशोधन, उत्पादन आणि प्रगत संरक्षण प्रणालींच्या विकासासाठी सहकार्य वाढवले जाणार आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण उद्योगांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला आहे.
याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकंडक्टर, ऊर्जा सुरक्षा, महत्त्वाच्या धातूंचा पुरवठा आणि आर्थिक सुरक्षितता या क्षेत्रांतही अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जागतिक पुरवठा साखळी अधिक विश्वासार्ह करण्यासाठी आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात परस्पर गुंतवणूक वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. बैठकीत मुक्त, खुला आणि नियमाधारित इंडो-पॅसिफिक प्रदेश कायम ठेवण्याबाबतही दोन्ही नेत्यांनी कटिबद्धता व्यक्त केली. सागरी सुरक्षा, संरक्षण सहकार्य, दहशतवादविरोधी प्रयत्न आणि प्रादेशिक स्थैर्य यांसाठी समन्वय वाढवण्यावरही भर देण्यात आला. क्वाडमधील सहकार्य अधिक प्रभावी करण्याबाबतही चर्चा झाली.
हे ही वाचा:
व्हेनेझुएलात भारताच्या ‘ऑपरेशन अमिस्ताद’चे कौतुक
होर्मुझमधील गोळीबारानंतर कच्चे तेल घेऊन जहाज भारतात दाखल
‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषात अमरनाथ यात्रेला प्रारंभ
दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेले चार जण जेरबंद
भारतामध्ये जपानी गुंतवणूक वाढवण्यावरही या परिषदेत विशेष भर देण्यात आला. उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग, सेमिकंडक्टर आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत जपानी कंपन्यांच्या नव्या गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. दोन्ही देशांतील आर्थिक भागीदारी अधिक व्यापक करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला. ताकाइची यांचा हा भारत दौरा त्यांच्या पंतप्रधानपदाचा पहिलाच अधिकृत भारत दौरा असून, बदलत्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीत भारत-जपान विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीला नवे बळ देणारा टप्पा मानला जात आहे.
