जम्मू-काश्मीरमधील वार्षिक अमरनाथ यात्रेला गुरुवार, २ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. जम्मूतील भगवती नगर आधार छावणीतून उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चंदरकोट येथे भाविकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
चंदरकोट हे जम्मूहून निघालेल्या यात्रेकरूंसाठी महत्त्वाचे विश्रांतीस्थळ मानले जाते. येथे प्रशासन, पोलिस, स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि लंगर समित्यांनी यात्रेकरूंसाठी विशेष स्वागताची व्यवस्था केली होती. अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली, तर मोफत भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
यावेळी डीआयजी सरगुन शुक्ला, रामबनचे उपायुक्त मोहम्मद इलियास खान, एसएसपी अरुण गुप्ता, एसएसपी ट्रॅफिक राजा आदिल हमीद यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी यात्रेकरूंशी संवाद साधत त्यांच्या सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
यात्रेदरम्यान भाविकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी जम्मू-काश्मीरच्या अन्न व औषध प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. आयुक्त खालिद जहांगीर यांनी चंदरकोट येथील लंगर केंद्राची पाहणी करून अन्नाचा दर्जा, स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यात्रामार्गावर विशेष अन्नसुरक्षा पथके तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यंदाची अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून २८ ऑगस्टपर्यंत म्हणजेच ५७ दिवस चालणार आहे. भाविकांना पारंपरिक ४८ किलोमीटरच्या पहलगाम मार्गासह १४ किलोमीटरच्या बालटाल मार्गानेही पवित्र अमरनाथ गुहेपर्यंत जाता येणार आहे. यंदा लाखो भाविक यात्रेत सहभागी होण्याची शक्यता असून प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि निवासाच्या व्यापक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
हे ही वाचा:
दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेले चार जण जेरबंद
‘मेक इन इंडिया’ला जपानचा पाठिंबा! अर्थकारण, संरक्षण, सेमिकंडक्टर भागीदारीला चालना
पाकिस्तानातील १२५ वर्षे जुन्या गुरुद्वाराच्या तोडफोडीवर भारताचा संताप
इंधनटंचाईवर मात करण्यासाठी रशियाची भारतातून पेट्रोल आयात
यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मार्गावर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि इतर सुरक्षा दलांनी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर विशेष तपासणी आणि सॅनिटायझेशन मोहीम राबवली. यात्रा सुरक्षित, सुरळीत आणि निर्विघ्न पार पडावी यासाठी प्रशासनाने विविध विभागांमध्ये समन्वय साधला असून प्रत्येक टप्प्यावर भाविकांना मदत करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.







