मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला असून जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीत दोन अमिराती तेलवाहू टँकरवर झालेल्या हल्ल्यानंतर इराणने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने दावा केला की संबंधित जहाजांनी वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले, आपली ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम (AIS) / नेव्हिगेशन प्रणाली बंद केली आणि बंदी घातलेल्या मार्गातून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
IRGC ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित सुपरटँकरना अनेक वेळा इशारे देण्यात आले होते. मात्र त्यांनी आदेशांचे पालन केले नाही. उलट जहाजांची नेव्हिगेशन प्रणाली बंद करून संशयास्पद मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना लक्ष्य करून निष्क्रिय करण्यात आले, असा दावा इराणने केला आहे.
दुसरीकडे, संयुक्त अरब अमिरातीने (UAE) या घटनेसाठी थेट इराणला जबाबदार धरले आहे. अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयानुसार, दोन तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला, तर इतर काही कर्मचारी जखमी झाले. या घटनेचा तीव्र निषेध करत योग्य प्रतिसाद देण्याचा इशाराही युएईने दिला आहे. हल्ल्यात मृत्यू झालेला खलाशी भारतीय असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तसेच जहाजावरील इतर काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे भारतासह अनेक देशांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
हॉर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा ऊर्जा मार्ग मानला जातो. आखाती देशांमधून जगभरात जाणाऱ्या कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा मोठा हिस्सा याच मार्गाने वाहतूक केला जातो. त्यामुळे येथे निर्माण होणारा कोणताही संघर्ष जागतिक ऊर्जा बाजारावर आणि तेलाच्या किमतींवर थेट परिणाम करू शकतो. अलीकडील तणावामुळे जहाजांची वर्दळ घटली असून जागतिक बाजारात पुन्हा एकदा अस्थिरता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
फ्रान्सच विश्वचषकाचा प्रबळ दावेदार
पुरुषांनी इंग्लंडमध्ये हात टेकले, महिलांनी घडवला इतिहास
भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंबाच्या वृत्ताचे खंडन
अनुपम खेर यांनी नसिरुद्दीन शाह यांना झोडपले!
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉर्मुझ परिसरातील सुरक्षा परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. व्यापारी जहाजे, तेलवाहू टँकर आणि ऊर्जा पुरवठा साखळीवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेनंतर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून पुढील काही दिवस मध्य पूर्वेतील घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.







