नेपाळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. हिंसक आंदोलनामुळे केपी शर्मा ओली यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लोक रस्त्यावर उतरले आहेत. सरकार कोसळल्यानंतरही आंदोलन अजूनही सुरू आहे. एकीकडे नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली असताना आता दुसरीकडे फ्रान्समध्येही निदर्शने सुरू झाली आहेत. फ्रान्समध्ये लोक सरकारविरुद्ध निदर्शने करत असून त्याला ‘ब्लॉक एव्हरीथिंग’ असे नाव देण्यात आले आहे.
बुधवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी पॅरिस आणि इतर प्रमुख शहरांमध्ये पोलिस आणि निदर्शकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यावेळी निदर्शकांनी कचऱ्याचे डबे आणि बॅरिकेड्स लावून रस्ते अडवले. बोर्डो आणि मार्सेलीमध्ये जमावाने महत्त्वाच्या चौकांना वेढा घातला आणि पोलिसांवर बाटल्या फेकल्या. पॅरिसमधील रेल्वे केंद्र असलेल्या गारे डू नॉर्ड स्टेशनवरही निदर्शकांनी हल्ला केला.
गृहमंत्री ब्रुनो रिटेललेऊ म्हणाले की, पश्चिमेकडील रेनेस शहरात एका बसला आग लावण्यात आली आणि नैऋत्येकडील एका वीजवाहिनीला झालेल्या नुकसानीमुळे रेल्वे मार्गावर अडथळा निर्माण झाला. त्यांनी आरोप केला की निदर्शक “बंडाचे वातावरण” निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या निदर्शनांदरम्यान पॅरिसमध्ये २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. हे लोक सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत होते असे पोलिसांनी म्हटले आहे. फ्रान्समधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकारने ८०००० हून अधिक पोलिस आणि सुरक्षा दल तैनात केले आहेत. निदर्शक रेल्वे आणि रस्ते वाहतूक रोखत आहेत आणि तेल डेपो, सुपरमार्केट आणि पेट्रोल पंपांना लक्ष्य करत आहेत.
हे ही वाचा :
ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘संभव’ची महत्त्वाची भूमिका; काय आहे संभव मोबाइल?
नेपाळमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर २७ जणांना अटक; शस्त्रे जप्त
झारखंड येथून आयसिसचा संशयित दहशतवादी अटकेत!
नेव्ही नगरातून इन्सास रायफल चोरलेले दोघे भाऊ तेलंगणातून अटकेत
राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सेबास्टियन लेकोर्नू यांना नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त केले तेव्हा हा हिंसाचार घडला. विश्वासमत गमावल्यानंतर राजीनामा द्यावा लागलेल्या फ्रँकोइस बायरोची जागा लेकोर्नू यांनी घेतली आहे.







