बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याच्या घटनांवर संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्हाला बांगलादेशातील परिस्थितीबद्दल चिंता आहे. आम्ही बांगलादेश सरकारला आवाहन करतो की, प्रत्येक नागरिकाचा धर्म काहीही असो, त्याची सुरक्षा सुनिश्चित करावी.
गेल्या आठवड्यापासून बांगलादेशात ढाक्यासह अनेक शहरांमध्ये निदर्शने आणि हिंसक घटना घडत आहेत. युवा नेता उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर व्यापक हिंसाचार उसळला असून या दरम्यान, दीपू चंद्रदास नावाच्या हिंदू तरुणाची हत्या झाली. या घटनेमुळे बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचाराकडे संयुक्त राष्ट्रांसह जगाचे लक्ष वेधले आहे. ईशनिंदेच्या आरोपाखाली जमावाने दीपूची हत्या केलीच नाही तर त्याचा मृतदेहही जाळण्यात आला.
बांगलादेशातील हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करताना, स्टीफन दुजारिक यांनी विशेषतः अल्पसंख्याकांसाठी संरक्षणाची गरज अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की बहुसंख्य समुदायाचे नसलेल्यांनाही सुरक्षित वाटण्याचा अधिकार आहे. म्हणूनच, बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे.
गुटेरेस यांच्या प्रवक्त्यांनी आशा व्यक्त केली की, युनूस सरकार प्रत्येक बांगलादेशी व्यक्तीला सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त व्होल्कर तुर्क यांनी बांगलादेशातील लोकांना शांतता राखण्याचे आणि हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी सर्वांसाठी सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
अल फलाह विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा रद्द होणार?
अमेरिकेत इस्लामी तत्त्व लादली जातायत!
केंद्र सरकारचा खजिना बिहारसाठी खुला
गायिकेसोबतचे गैरवर्तन अत्यंत निंदनीय
अमेरिकेनेही बांगलादेशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोमवारी, अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाच्या दोन सदस्यांनी हिंसाचाराचा निषेध केला. काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती म्हणाले, बांगलादेशातील दीपू चंद्र दास या हिंदू व्यक्तीच्या लक्ष्यित जमावाने केलेल्या हत्याकांडाने मी चिंतीत झालो आहे. सुहास सुब्रमण्यम यांनीही ढाकामधील अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांना चिंताजनक म्हटले.







