भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीचे श्रेय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले होते. भारताने हा दावा फेटाळून लावला होता. दरम्यान, यावरून संभ्रम निर्माण झाला होता. आता अखेर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या भूमिकेबद्दल, विशेषतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या मध्यस्थीच्या दाव्याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. एस जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे की, १० मे रोजी झालेली युद्धबंदी ही नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील थेट वाटाघाटींचा परिणाम होती.
नेदरलँड्सस्थित एनओएसला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर म्हणाले की, भारतीय हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्याला हे मान्य करण्यास भाग पाडले गेले की एकमेकांवर होत असलेला गोळीबार थांबवला पाहिजे. त्यानंतर हा करार झाला. या सामंजस्य करारात किंवा पाकिस्तानसोबतच्या कोणत्याही संभाव्य चर्चेत अमेरिकेची कोणतीही भूमिका असण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.
भारताने दहशतवादी स्थळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने भारतावर गोळीबार करण्याचा निर्णय घेतला आणि भारतानेही त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले, असे त्यांनी नमूद केले. १० मे रोजी पाकिस्तानच्या हवाई तळांवर आणि हवाई संरक्षण यंत्रणेवर भारताने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या सैन्याला हे मान्य करण्यास भाग पाडले की दोन्ही देशांनी एकमेकांवर गोळीबार थांबवावा.
हे ही वाचा..
किश्तवाडमध्ये अनेक अतिरेक्यांना घेराव
अमृत भारत स्टेशन योजना : माणसं नाही, रोबोट करतील अनाउंसमेंट!
“फ्री पॅलेस्टाईन”च्या घोषणा देत इस्रायली दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांवर गोळीबार
जयशंकर म्हणाले की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे त्यांच्याशी बोलले तर उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम आशिया आणि इतर प्रदेशातील देशांच्या नेत्यांनीही संपर्क साधला. जेव्हा दोन देश संघर्षात गुंतलेले असतात, तेव्हा जगातील इतर देश फोन करून त्यांची चिंता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात हे स्वाभाविक आहे. परंतु, गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट वाटाघाटी झाल्या होत्या,” असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, आम्ही आमच्याशी बोलणाऱ्या फक्त अमेरिकेलाच नाही तर सर्वांना एक गोष्ट स्पष्ट केली, की जर पाकिस्तानला लढाई थांबवायची असेल तर त्यांनी आम्हाला सांगावे. त्यांच्या जनरलला आमच्या जनरलला हे फोन करून सांगावे लागेल आणि तेच घडले.







