अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा अद्याप सुरू असून, ती राजनैतिक मार्गाने यशस्वी झाली किंवा लष्करी कारवाईपर्यंत पोहोचली, तरी अखेरीस विजय अमेरिकेचाच होईल. कोणत्याही संभाव्य कराराची सर्वात महत्त्वाची अट म्हणजे इराणला कधीही अण्वस्त्रे विकसित करता येता कामा नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे हे आहे.
इराणसोबत सुरू असलेल्या चर्चेबाबत विचारले असता ते म्हणाले, “पुढे काय होते ते पाहू. आम्ही एक ना एक मार्गाने विजय मिळवू. तो कागदावरील करारातून असो किंवा लष्करी ताकदीच्या बळावर; कोणत्याही परिस्थितीत विजय आमचाच असेल.” ते पुढे म्हणाले की, चर्चेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा पूर्वीप्रमाणेच कायम आहे. “करारातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इराणकडे अण्वस्त्रे नसावीत. त्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी लगेचच खुली होईल,” असे ट्रम्प यांनी सांगितले.
इराणला अण्वस्त्रे मिळू नयेत, यावर जगातील बहुतांश देशांचे एकमत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “इराणला अण्वस्त्रे बाळगण्याची परवानगी देता येणार नाही. जवळपास सर्वच जण याबाबत सहमत आहेत,” असे ते म्हणाले. संभाव्य नव्या कराराची तुलना त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या अणुकराराशी केली. ट्रम्प म्हणाले, “ओबामा यांनी चुकीचा निर्णय घेतला होता. मी तो करार रद्द केला, कारण तो इराणला अण्वस्त्रांच्या दिशेने नेणारा मार्ग होता. सध्या चर्चा चांगल्या सुरू आहेत; पुढे काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. मात्र कोणत्याही करारामुळे इराणला अण्वस्त्रे विकसित करता येणार नाहीत.”
इराणने अमेरिकन सैनिकांवर हल्ला केल्यास अमेरिका लष्करी प्रत्युत्तर देईल का, असा प्रश्न विचारण्यात आला असता ट्रम्प म्हणाले, “जर त्यांनी अमेरिकन सैनिकांची हत्या केली, तर मी अतिशय त्वरित कारवाई करेन.” इराणच्या नव्या सर्वोच्च नेतृत्वासोबत राजनैतिक संवादाची शक्यता अद्याप कायम असल्याचे संकेतही त्यांनी दिले. “मला भेट घेण्याची विशेष इच्छा नाही. मात्र भेट झाली, तर तो माझ्यासाठी सन्मान असेल. आपण एखादा करार करू शकतो का, हे मला पाहायचे आहे,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
एका वर्षासाठी पाठवलेले यान ११ वर्षे कार्यरत; ‘मेवेन’ मोहिमेचा प्रवास अखेर संपला
चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचे निधन
पुणे बनावट दारू प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर
पावसाच्या सरींसह मान्सूनचा श्रीगणेशा; केरळमध्ये आगमन
प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी अमेरिकेने युरोपीय मित्रदेशांचे सहकार्य मागितले होते. मात्र गरज पडल्यास अमेरिका एकटीही कारवाई करू शकते. “आम्हाला त्यांच्या मदतीची गरज नाही. जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर आमच्याकडे आहे,” असे ट्रम्प म्हणाले.
इराणच्या अणुकार्यक्रमासंदर्भातील वाद आणि प्रादेशिक सुरक्षेच्या प्रश्नांवर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू असतानाच ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक असून, जागतिक तेलपुरवठ्याचा मोठा हिस्सा या सामुद्रधुनीतून जातो.
