अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंगळवारपासून मंदिर रामभक्तांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर पहिल्याच दिवशी रामभक्तांचा महापूर उसळला आहे. पहिल्याच दिवशी विक्रमी पाच लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. अयोध्येला पोहोचणाऱ्या भक्तांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ येथे वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
पहिल्याच दिवशी रामलल्लाच्या दर्शनासाठी रामभक्तांचा महापूर उसळल्याने प्रशासनाला सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करावी लागली.
या दरम्यान काहीजणांना किरकोळ दुखापत झाल्याचेही समजते. अशा परिस्थितीत योगी आदित्यनाथ यांनी सर्वांत आधी लखनऊमधून लाइव्ह स्ट्रिमिंगच्या साह्याने परिस्थितीचा आढावा घेतला. योगी यांनी सर्वांत आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवले आणि त्यानंतर त्यांनी स्वतः मंदिरात पोहोचून सुरक्षा व अन्य व्यवस्थांची पाहणी केली.
हे ही वाचा:
कॅरम, घोडेस्वारी, बिलियर्ड्स, पॉवरलिफ्टिगं, शरीरसौष्ठवसाठी दरवाजे पुन्हा उघडले!
हमाससोबतच्या लढाई दरम्यान झालेल्या स्फोटात इस्रायलचे २१ सैनिक ठार
श्रीरामाच्या रॅलीवरील हल्ला प्रकरणी मिरारोडमध्ये कडेकोट बंदोबस्त, नितेश राणे भेट देणार
भव्य राम मंदिरात रोज होणार पूजा; पहाटे चार वाजता रामलल्ला उठणार
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांना संयम ठेवण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनही पाहणी केली. चोख सुरक्षाव्यवस्थेसाठी अधिकाऱ्यांना निर्देशही दिले. आठ ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात केले. साधूसंत आणि सर्वसामान्य भाविकांना सहज दर्शन मिळावे, यासाठी सर्व आवश्यक त्या सुविधा देण्याचे निर्देशही दिले.
अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर येथे येणाऱ्या वाहनांना काही दिवसांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गाड्यांसाठी केलेले सर्व ऑनलाइन बुकिंग रद्द करण्यात आले आहे. भाविकांच्या बसचे पैसेही परत केले जाणार आहेत. खूप गर्दी लोटल्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने सर्व गाड्यांना पंचकोशी परिक्रमा येथेच थांबवले होते. दोन वाजेपर्यंत भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली होती.







