अहमदाबाद पोलिस आणि क्राइम ब्रांचने शहरातील विविध भागांमध्ये उशिरा रात्री मोठी मोहीम राबवून २९० हून अधिक संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. ही कारवाई चांडोला, गुलाबनगर आणि खोडियारनगर परिसरात करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये १३१ जणांना औपचारिकरित्या अटक करण्यात आली असून, सुमारे १६० जणांची क्राइम ब्रांचकडून चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. ही मोहीम गुजरात सरकारने राज्यातील बेकायदेशीर स्थलांतराविरोधात सुरू केलेल्या कठोर कारवाईचा भाग आहे.
हर्ष संघवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, गुजरातमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात गृह विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. अहमदाबाद, सूरत, राजकोट आणि वडोदरा यांसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विशेष मोहीम राबवली जात असून, बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
सांगवी यांनी सांगितले की, पोलिस, क्राइम ब्रांच, स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि इतर कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी राज्यातील विविध भागांत सखोल तपासणी आणि शोधमोहीम राबवली. या कारवाईत मोठ्या संख्येने संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून, बेकायदेशीर घुसखोरीविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.
हे ही वाचा:
दिल्लीतील मालवीय नगरमधील रेस्टॉरंटला आग; २२ जणांचा मृत्यू
गोपाळगड किल्ल्याच्या किल्ल्या कुणाकडे? १५ दिवसांत अहवाल सादर करा!
अमेरिकेचा भारतासह ६० देशांवर नव्या शुल्काचा प्रस्ताव
दोन दगडांवर पाय, दोन दगडांवर नजर: भारताची म्यानमार नीती… |
अहमदाबादमधील कारवाईदरम्यान चांडोला, गुलाबनगर आणि खोडियारनगर या भागांमध्ये शोध व पडताळणी मोहीम राबवण्यात आली. यापूर्वीही अशा कारवायांमध्ये हे भाग प्रशासनाच्या रडारवर आले होते.
क्राइम ब्रांचचे संयुक्त पोलिस आयुक्त शरद सिंघल यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्तींची ओळख, राष्ट्रीयत्व आणि भारतातील कायदेशीर वास्तव्याची स्थिती निश्चित करण्यासाठी पडताळणी सुरू आहे. यामध्ये ओळखपत्रे आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भरुच, सूरत आणि राजकोट येथेही अशाच प्रकारच्या शोध व पडताळणी मोहिमा राबवण्यात आल्या. गुजरात सरकारने स्पष्ट केले आहे की, राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहील आणि येत्या काही दिवसांत आणखी तपासणी व अंमलबजावणी मोहिमा राबवल्या जातील.







