‘अग्निवीराला शिस्त, कौशल्ये रोजगारक्षम बनवेल’

‘अग्निवीराला शिस्त, कौशल्ये रोजगारक्षम बनवेल’

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा करताच या योजनेला विरोध करण्यासाठी काही राज्यांमध्ये तरुणांनी निषेध नोंदवला. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. त्यानंतर या योजनेबद्दल सर्वच स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “अग्निपथ योजनेवर सुरू असलेल्या हिंसाचारामुळे दुःख होत आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला गेला तेव्हा मी म्हणालो होतो की, अग्निवीर या कालावधीत जी शिस्त आणि कौशल्ये शिकेल ते त्याला विशेषतः रोजगारक्षम बनवेल. महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना नियुक्त करण्याच्या या संधीचे स्वागत करतो,” असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

अग्निपथ योजनेची घोषणा करताना तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होईल, त्यांना नव्या संधी मिळतील असा दावा केंद्र सरकारने केला आहे. मात्र, अनेक आंदोलकांनी अग्निवीरांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर काही हिंसक घटना घडल्या असून याचा सर्वाधिक फटका बिहार राज्याला बसला आहे.

हे ही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात पावसाची खेळी; मालिका बरोबरीत सुटली

विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज रणधुमाळी!

‘अग्निपथ योजनेविरुद्ध आंदोलन उचकावण्यात काँग्रेसचा हात’

‘बाळासाहेबांचे विचार विसरलेले आमदारचं काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करतील’  

दरम्यान, अग्निपथ या योजनेवर होत असलेल्या टीकेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांमध्ये पुन्हा चर्चा झाली. त्यानंतर काही महत्त्वाच्या घोषणा रविवार, १९ जून रोजी करण्यात आल्या. त्यात लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी स्पष्ट केले की, सेनादलात शिस्तीला महत्त्व आहे. तिथे तोडफोड, दंगे करणाऱ्या तरुणांना अजिबात स्थान नाही. त्यामुळे ती व्यक्ती कोणत्याही अशा आंदोलनात, तोडफोडीत सामील नाही हे त्याला सिद्ध करावे लागेल. त्यासाठी या इच्छुक व्यक्तीने पोलिसांचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय, त्याला संधी नाही.

Exit mobile version