“लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशच दैवत मानतो. मी त्यांच्या चौकशीची भाषा कधीही केली नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, असे म्हणायचे होते.” अशी सारवासारव राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
भारतातील शेतकरी आंदोलनावर पॉप सिंगर रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा आणि ग्रेटा थनबर्ग यांनी भारतविरोधी ट्विट केले. या ट्विट्सच्या विरोधात भारतातील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी #IndiaTogether या हॅशटॅगने ट्विट केले होते.
यामध्ये सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यांच्यासारख्या अनेक प्रसिद्ध कलाकार आणि खेळाडूंचा समावेश होता. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत आहे असा आरोप महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. हे कारण देऊन या सुप्रसिद्ध व्यक्तींच्या ट्विट्सची चौकशी करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले होते.
या चौकशीच्या आदेशावर भाजपकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरच्या चौकशीचे आदेश मागे घ्यावेत आणि त्याऐवजी सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा यासारख्या सेलिब्रिटींची चौकशी करावी. अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली होती.
हे ही वाचा:
“चौकशीची मागणी करणाऱ्यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी आवश्यक”- देवेंद्र फडणवीस
तर “भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत, निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” असा सवाल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला होता. “खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे.” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे.” अशी सणसणीत टीका भाजपा आमदार अतूल भातखळकर यांनी केली होती.







