राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सभागृहात शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. रुग्णालयांची संख्या आणि दर याबद्दल हे प्रश्न होते. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, रुग्णालयांची नोंदणी संख्या वाढवली जाणार असून शहरी भागातील अतिरिक्त खर्चाचा भार सरकार म्हणून कसा कमी करता येईल यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
आयुष्मान योजनांच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांची संख्या कमी असून एमएमआर रिजनमधील रुग्णालयांसाठी सरकारने लागू केलेले दर अत्यंत तुटपुंजे आहेत, त्यामुळे रुग्णांना फारसा लाभ होत नाही, असा मुद्दा उपस्थित करून अतुल भातखळकर यांनी सरकारला उपाययोजनासंबंधी प्रश्न विचारला. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले.
अतुल भातखळकर म्हणाले की, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यासंबंधी सरकार मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करत आहे. पण, मुंबई, एमएमआर रिजन, उपनगरे येथील लोकांना या योजनांचा फारसा फायदा होत नाही. याची कारणे म्हणजे उपनगरांमध्ये या योजनांच्या अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांची संख्या ही एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कमी आहे. तसेच रुग्णालयांसाठी सरकारने लागू केलेले दर हे अत्यंत अल्प स्वरूपाचे आहेत. विशेषतः एमएमआर रिजनमधील रुग्णालयांना हे दर परवडणारे नाहीत.
याच माहितीच्या आधारे त्यांनी सरकारला दोन प्रश्न सभागृहात विचारले. या योजनांअंतर्गत आणखी रुग्णालयांच्या नोंदी व्हाव्यात यासाठी मोहीम राबवली जाणार आहे का आणि मुंबई, एमएमआर रिजन, उपनगरे येथील रुग्णालयांसाठी वेगळे दर पत्रक जाहीर करण्यासाठी सरकार विचार करत आहे का, असे सवाल त्यांनी विचारले.
हे ही वाचा:
कुरारमध्ये इमारतीत शिरून हल्ला करणाऱ्या गर्दुल्ल्याविरोधात फक्त ‘एनसी’
ईरानवरील हल्ला: जागतिक अर्थव्यवस्थेला बसणारा मोठा धक्का
वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यापूर्वी गौतम गंभीर कालीघाट मंदिरात
रणजी ट्रॉफीत जम्मू-काश्मीरचा ऐतिहासिक विजय
अतुल भातखळकर यांच्या प्रश्नांना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उत्तर देत म्हटले की, राज्यामध्ये १ जुलै २०२४ पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रपणे राबवत आहोत. यातून १० लाख रुपयांपर्यंतचा विमा कवच राज्यातील अडीच कोटी कुटुंबाना मिळत आहे. पूर्वी १,३६९ रोगांचा यात समावेश होता आता २,३९९ रोगांचा यात समावेश आहे. पूर्वी २,००० रुग्णालयांची नोंदणी होती पण, आता ४,००० हून अधिक रुग्णालयांची नोंदणी केलेली आहे. येत्या काळात ही संख्या ६,९४७ पर्यंत रुग्णालयांची संख्या जाणार असल्याचे मेघना बोर्डीकर म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या की, मुंबई, एमएमआर रिजन येथील आणखी रुग्णालयांसोबत या योजनांअंतर्गत नोंदणीसाठी बैठका सुरू आहेत. तसेच मुंबई, एमएमआर रिजन, उपनगरे येथील अतिरिक्त खर्चाचा भार सरकार म्हणून कसा कमी करता येईल यासाठी बैठक घेणार असल्याचे मेघना बोर्डीकर म्हणाल्या.







