29.6 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरराजकारणकाही महत्त्वाकांक्षी नेते भारताला कमकुवत करू पाहत आहेत

काही महत्त्वाकांक्षी नेते भारताला कमकुवत करू पाहत आहेत

सरसंघचालक मोहन भागवतांचा निशाणा

Google News Follow

भारताची प्रगती रोखण्यासाठी आणि देशाची व्यवस्था कमकुवत करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. सत्तेच्या स्वार्थासाठी आणि विवेकाच्या अभावामुळे काही महत्त्वाकांक्षी नेतेही अशा प्रयत्नांमध्ये सहभागी होत असल्याचे ते म्हणाले. नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात केलेल्या भाषणात मोहन भागवत यांनी ‘रेजिम चेंज’ म्हणजेच सत्ताबदलाच्या प्रयत्नांचा उल्लेख करत भारताच्या स्थैर्याबाबत चिंता व्यक्त केली.

‘रेजिम चेंज’वर भाष्य

जगातील विविध देशांमध्ये सत्ताबदल घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा मोहन भागवत यांनी केला. फ्रान्स, अल्बानिया, बांगलादेश आणि नेपाळमधील अशांततेकडे लक्ष वेधताना आरएसएस प्रमुख म्हणाले की, “पश्चिमेकडून एक वादळ आले आहे, जे सुव्यवस्था, सभ्यता, कल्याण आणि सांस्कृतिक व मानवी मूल्यांचे सर्व प्रकार नष्ट करू पाहते.” स्वतःचे हितसंबंध जपणाऱ्या शक्तींना वर्चस्व कायम ठेवायचे असून, त्यासाठी वेगवेगळ्या देशांमधील परिस्थितीचा फायदा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची वाढती प्रगती या शक्तींच्या हितसंबंधांच्या आड येत असल्याने भारत हे त्यांचे प्रमुख लक्ष्य असल्याचेही मोहन भागवत यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, भारताची धोरणे आणि देशाला पुढे नेणारे नेतृत्व यांचा परिणाम जागतिक स्तरावर जाणवत आहे. भारताने आपल्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण करताना जागतिक घडामोडींकडे सजगपणे पाहण्याची गरज असल्याचा संदेश त्यांच्या भाषणातून देण्यात आला.

स्वातंत्र्यलढ्यापेक्षाही मोठ्या त्यागाची गरज

देशाच्या भविष्याबाबत बोलताना मोहन भागवत यांनी नागरिकांना मोठ्या त्यागासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिले. आता देशाच्या प्रगतीसाठी आणि स्वतःच्या सांस्कृतिक ओळखीच्या रक्षणासाठी त्यापेक्षाही मोठ्या त्यागाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. देश स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रीय एकात्मता आणि प्रगतीच्या मार्गावर वाटचाल सुरू झाली असली, तरी ही वाटचाल अधिक मजबूत करण्यासाठी समाजाने आपल्या मूल्यांचे आचरणात पालन करणे गरजेचे असल्याचे मोहन भागवत यांनी अधोरेखित केले.

विविधतेतील एकात्मता जपण्याचे आवाहन

भारतामध्ये धर्म, पंथ, जात, भाषा, प्रांत, खाद्यसंस्कृती आणि परंपरांमध्ये विविधता आहे. या विविधतेचा स्वीकार करून सर्वांकडे आपलेपणाने पाहणारा दृष्टिकोन देशाच्या एकात्मतेचा आधार असल्याचे भागवत म्हणाले. विविधतेतील एकता विसरल्यामुळे समाज दुर्बल होतो, तर परस्परांचा आदर आणि सामाजिक समरसता यांमुळे समाज अधिक मजबूत बनतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेतील ‘आम्ही भारताचे लोक’ या भावनेचा उल्लेख करत त्यांनी भावनिक एकात्मता अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली. भारतीय परंपरेतील एकात्मतेचे तत्त्व केवळ विचारांपुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनातही उतरवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

“पॅरिस लवकरच बनणार मुस्लिम शहर!”

एशियन पॅरा गेम्समध्ये भालाफेकीत भारताचा डबल धमाका! रिंकूला सुवर्ण, अजित सिंहला रौप्य

प्रज्ञान ओझा टीम इंडियाचे नवे मुख्य निवडकर्ते

अधारिका फाउंडेशनच्या ‘नवदुर्गा पुरस्कारां’नी नऊ दृष्टिहीन महिलांचा गौरव

स्वबोधातून देशाला सक्षम करण्यावर भर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या कार्याचा उल्लेख करताना मोहन भागवत यांनी देशाची ओळख, इतिहास आणि सांस्कृतिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला. या जाणीवेतून समाज संघटित करणे आणि भारताला अधिक सक्षम व स्वावलंबी बनवणे, हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा