काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आसाममधील दिग्गज नेते भूपेन बोरा यांनी गांधी कुटुंबावर तीव्र टीका केली आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम करूनही तब्बल ७ महिने गांधी कुटुंबाकडून भेटीची वेळ न दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी त्यांनी भाजप नेतृत्वाचे कौतुक केले.
बोरा म्हणाले की, “काँग्रेसमध्ये अनेक वर्षे घालवूनही मला सात महिने गांधी कुटुंबातील सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी किंवा काँग्रेस महासचिव प्रियांका वड्रा यांच्यापैकी कुणाचीही भेट मिळाली नाही.” याउलट, केंद्रीय गृहमंत्री अणित शहा यांनी पाच मिनिटांत भेट दिल्याचा दावा त्यांनी केला.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी सात महिने प्रतीक्षा केली; पण गांधी कुटुंबाकडून वेळ मिळाला नाही. मात्र अमित शाह पाच मिनिटांत भेटले. यावरून दोन्ही पक्षांतील संस्कृतीतील फरक स्पष्ट होतो.”
त्यांनी पुढे आरोप केला की काँग्रेस नेते गौरव गोगोई यांना त्यांच्या घरी येण्यासाठी नऊ महिने लागले, तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्वशर्मा यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर २४ तासांत त्यांच्या घरी भेट दिली. “यावरून वेगवेगळ्या राजकीय संस्कृतींमध्ये नेत्यांना कशी वागणूक दिली जाते, हे स्पष्ट होते,” असे बोरा म्हणाले.
हे ही वाचा:
जैशच्या सात दहशतवाद्यांचा जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये खात्मा
पायाला गोळी लागली; पण ‘टायसन’ने किश्तवारमध्ये दहशतवाद्यांना हुडकलेच
आदित्य ठाकरेंची पवारांच्या नावावर फुली
काँग्रेस पक्षाचा तळागाळातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांशी संपर्क तुटल्याचाही त्यांनी दावा केला. अंतर्गत गोंधळ, नेतृत्वापर्यंत पोहोच नसणे आणि निर्णयप्रक्रियेत होणारा विलंब यामुळे राज्यातील काँग्रेसचा प्रभाव कमी झाल्याचा आरोप त्यांनी केला.
रविवारी आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला. भाजपच्या राज्याध्यक्ष दिलीप सैकिया आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.







