जम्मू-काश्मीरमधील किश्तवार जिल्हा येथील छत्रू भागात रविवारी सुरक्षा दलांनी महिनाभर शोध घेत असलेल्या तीन दहशतवाद्यांचा अखेर माग काढला. मात्र त्यांना सर्वप्रथम शोधून काढणारा ‘नायक’ ठरला तो लष्कराचा श्वान टायसन. सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीदरम्यान तिन्ही दहशतवादी ठार झाले; मात्र पहिली गोळी टायसनला लागली.
हे तिन्ही पाकिस्तानी दहशतवादी जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबंधित होते. जम्मू-काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त पथकांनी गेल्या महिनाभर त्यांचा शोध सुरू ठेवला होता. अधिकृत सूत्रांच्या मते, त्यापैकी एक जण स्वतःला जैश कमांडर म्हणवणारा सैफुल्ला असावा, अशी शक्यता आहे.
रविवारी शोधमोहीमेदरम्यान टायसन एका मातीच्या घरात शिरला आणि तेथे दहशतवादी लपून बसल्याचे त्याने ओळखले. दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. पायाला गोळी लागूनही टायसनने मागे हटणे नाकारले आणि सुरक्षा दलांना दहशतवाद्यांशी संपर्क प्रस्थापित करण्यास मदत केली, असे सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा:
अजित पवार म्हणजे महाराष्ट्राला न लाभलेला मुख्यमंत्री!
जैशच्या सात दहशतवाद्यांचा जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये खात्मा
“राहुल गांधींनी इंडी आघाडीची सूत्रे ममता बॅनर्जींकडे सोपवावीत”
जखमी टायसनला तत्काळ हवाईमार्गे उपचारासाठी हलवण्यात आले असून तो आता सुरक्षित आहे आणि प्रकृती सुधारत आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात १८-१९ जानेवारीच्या मध्यरात्री छत्रूतील सिंगपोरा भागात दाट जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी शोध पथकावर गोळीबार केला होता. त्या घटनेत लष्कराचे हवालदार गजेंद्र सिंग शहीद झाले, तर सात जवान जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे भूमिगत आश्रयस्थान उध्वस्त केले होते. त्या ठिकाणी दीर्घकाळ राहता यावे यासाठी अन्नसाठाही आढळला होता. पुढे दोन-तीन वेळा दहशतवाद्यांशी संपर्क झाला, मात्र ते प्रत्येक वेळी पसार झाले.
यावेळी मात्र दहशतवादी अशा भागात अडकले होते, जिथे नैसर्गिक आडोसा देणारी झाडी जवळपास नव्हती. त्यामुळे सुरक्षा दलांनी त्यांना घेरून ठार करण्यात यश मिळवले.







