नीट-यूजी पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकारांविरोधात ३७ दिवस चाललेल्या आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके आणि त्याच्या कोअर टीमने संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सीजेपी सध्या निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नसून ‘दबावगट’ म्हणून काम करणार असल्याचे दिपके याने सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे सीजेपीच्या मुख्य कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना दिपकेने बेरोजगारी, इथेनॉल मिश्रित इंधन धोरण आणि झारखंडमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन यांसह अनेक मुद्द्यांवर संघटना पुढे काम करणार असल्याचे सांगितले.
‘राजकीय पक्ष बनण्याची गरज नाही’
दिपकेने सध्या सीजेपीला राजकीय पक्षात रूपांतरित करण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली. त्याच्या मते, देशातील नागरिकांचा राजकीय पक्ष, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि निवडणूक आयोगावरील विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आणखी एक राजकीय पक्ष निर्माण करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर सरकार आणि संस्थांवर दबाव निर्माण करणारी चळवळ आवश्यक आहे, अशी भूमिका त्याने मांडली.
हे ही वाचा:
‘माफी मागणार नाही’; सावजी वादावर तुकाराम मुंढे ठाम
आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचा महागाईचा अंदाज ५% वर
पाकिस्तानसे गिरे, खजूर भारत मे अटके…किंमत ३ कोटी
दिपके म्हणाला की, सीजेपीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला आंदोलनाचा केंद्रबिंदू शिक्षण आणि परीक्षा गैरप्रकार हा होता; मात्र आंदोलन विस्तारल्यानंतर संस्थांच्या उत्तरदायित्वाचा मुद्दाही पुढे आला. त्यामुळे सीजेपी जनआंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेरोजगारीपासून इथेनॉल मिश्रित इंधनापर्यंत मुद्दे
सीजेपीच्या पुढील बैठकीत केवळ परीक्षा आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होणार नाही. वाढती बेरोजगारी आणि वाहनांच्या इंधनामध्ये इथेनॉल मिश्रणाच्या सरकारी धोरणासह विविध सार्वजनिक प्रश्नांवर संघटना भूमिका घेणार आहे. दिपके याने सांगितले की, देशातील तरुणांशी संबंधित प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यांना केवळ निवडणुकीच्या राजकारणाच्या चौकटीत पाहता येणार नाही.
सीजेपीचा मुख्य प्रवक्ता सौरव दास यानेही संघटना राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर तळागाळातील जनचळवळ म्हणून काम करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, देशात आधीच अनेक राजकीय पक्ष आहेत. तरीही नागरिकांच्या समस्या कायम असतील, तर केवळ आणखी एक राजकीय पक्ष निर्माण करणे हा त्यावरील उपाय नसल्याचे त्यांनी म्हटले. सीजेपीचे काम जनजागृती आणि तळागाळातील संघटन उभारण्यावर केंद्रित असेल, असे दास यांनी स्पष्ट केले.
झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
झारखंडमधील परीक्षा गैरप्रकारांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता अभिजीत दिपकेने सीजेपी त्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. झारखंडमध्ये विद्यार्थी आणि नोकरीचे इच्छुक गेल्या महिन्यापासून आंदोलन करत आहेत. भरती परीक्षांमध्ये कथित पेपरफुटी आणि गैरप्रकार झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
विशेषतः १४व्या झारखंड लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील कथित गैरप्रकारांवरून रांचीमध्ये आंदोलन सुरू आहे. दिपके यांनी स्पष्ट केले की, सीजेपी झारखंडमध्ये जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक मागणीला पाठिंबा देणार आहे.
महाराष्ट्रात दोन दिवस बैठक
नीट-यूजी पेपरफुटीच्या आरोपांवरून सुरू झालेल्या ३७ दिवसांच्या आंदोलनानंतर सीजेपीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहे. बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस ही बैठक होणार आहे. सीजेपीचा संस्थापक अभिजीत दिपके, मुख्य प्रवक्ता सौरव दास, प्रवक्त्या वैष्णवी गौर यांच्यासह संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत.
