आसाम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नगांवचे खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. उमेदवार निवडीवरून राज्य नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. बोरदोलोई यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सुपूर्द केला असून, त्यामुळे पक्षासोबतचा त्यांचा दीर्घ राजकीय प्रवास संपुष्टात आला आहे. आसाममधील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा राजीनाम्याचा निर्णय हा कॉंग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बोरदोलोई यांचे मतभेद विशेषतः आसाम प्रदेश काँग्रेस कमिटी (APCC) अध्यक्ष गौरव गोगोई यांच्यासोबत उघडपणे समोर आलेत. त्यांच्या जवळच्या अनेक नेत्यांनीही अलीकडे पक्ष सोडला आहे, ज्यात कामरूप मेट्रो जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नबज्योति तालुकदार यांचा समावेश आहे.
बोरदोलोई यांच्या राजीनाम्यामागील मुख्य कारण लाहोरीघाट विधानसभा मतदारसंघावरील वाद असल्याचे सांगितले जाते. त्यांनी AICC चे महासचिव जितेंद्र सिंग यांना लिहिलेल्या पत्रात उमेदवार निवडीदरम्यान त्यांच्याशी अपमानास्पद वर्तन झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपल्या पत्रात दुःख आणि वेदना व्यक्त करत विद्यमान आमदार आसिफ मोहम्मद नजर यांना पुन्हा तिकीट देण्यास विरोध दर्शवला. १३ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत त्यांनी नजर यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते, परंतु ते खोटे असल्याचे सांगत फेटाळण्यात आले, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी असेही आरोप केले की, स्क्रीनिंग कमिटीचे सदस्य इमरान मसूद यांनी त्यांच्या दाव्यांना नकार दिला, तर गौरव गोगोई यांनी या मुद्द्यावर मौन बाळगले.
बोरदोलोई यांनी आपल्या पत्रात २०२५ मध्ये नगांव जिल्ह्यातील धिंग भागातील डूमडूमिया येथे झालेल्या एका राजकीय कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचाही उल्लेख केला. या प्रकरणात पोलिस तपासानंतर एमदादुल इस्लाम नावाच्या व्यक्तीला अटक करून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला. ही व्यक्ती लाहोरीघाटच्या आमदाराची जवळची असल्याचे त्यांनी सांगितले. याच व्यक्तीचा मोरीगाव येथील पक्षाच्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आल्याने त्यांची नाराजी वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा:
प. बंगाल विधानसभा निवडणुकीतील पारदर्शकतेसाठी विशेष पथकाची स्थापना
कलिना पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीचा संशयास्पद मृत्यू
होर्मुझ सामुद्रधुनीजवळील इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर अमेरिकेने टाकले ‘बंकर बस्टर’ बॉम्ब
अदानी समूहाला जयप्रकाश असोसिएट्स अधिग्रहणासाठी NCLT ची मंजुरी
दरम्यान, काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने मान्य केले की बोरदोलोई यांचा राजीनामा हा पक्षासाठी मोठा धक्का आहे. ते APCC च्या जाहीरनामे समितीचे अध्यक्ष राहिले असून, संघटनेत त्यांचा मोठा अनुभव आहे. १९९० च्या दशकापासून ते काँग्रेसशी जोडलेले होते. हितेश्वर सैकिया यांच्या कार्यकाळात त्यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम केले. नंतर ते महासचिव झाले आणि १९९८ मध्ये मरघेरिटा पोटनिवडणूक जिंकून विधानसभा सदस्य बनले. तरुण गोगोई यांच्या सरकारमध्ये त्यांनी २००१ ते २०१५ दरम्यान उद्योग आणि ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. २०१९ मध्ये त्यांनी नगांव लोकसभा मतदारसंघ जिंकला आणि २०२४ मध्ये पुन्हा खासदार म्हणून निवडून आले.







