नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे सांगितले की, “भाजप हा आज महाराष्ट्रातील नंबर वन पक्ष ठरला आहे.”
फडणवीस म्हणाले की, या निकालांनी महाराष्ट्रातील जनतेचा भाजपवर असलेला विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. “राज्यातील शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात भाजपने दमदार कामगिरी केली असून, हे यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे आणि जनतेच्या विश्वासाचे फलित आहे,” असे त्यांनी नमूद केले.
फडणवीस म्हणाले की, जनतेने भाजपाला आणि महायुतीला प्रचंड समर्थन दिले आहे. निवडून येणाऱ्या एकूण नगराध्यक्षांपैकी ७५ टक्के नगराध्यक्ष हे महायुतीचे असतील असे मी भाकीत केले होते, ते जनतेने पूर्ण केले. भाजपाचे १२९ नगराध्यक्ष निवडून आले.
हे ही वाचा:
‘परीक्षा पे चर्चा’ : आतापर्यंत १.५४ कोटी नोंदणी
बांगलादेशमध्ये मारल्या गेलेल्या हिंदू युवकाने ईशनिंदा केली नव्हती!
परदेशी मिशनच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध
समाजवादी पार्टी सर्व बाजूंनी संपुष्टात येणार
फडणवीसांनी सांगितले की, गेल्या २०-२५ वर्षांत एवढा मोठा विजय कुणालाही मिळालेला नाही. आम्ही या निवडणुकीत सकारात्मक प्रचार केला. एकाही विरोधी पक्षनेत्यावर किंवा पक्षावर आम्ही टीका केली नाही. आम्ही फक्त विकासावर मते मागितली आणि जनतेने ती दिली. मुख्यमंत्र्याने एकाही विरोधकावर टीका न करताही मिळालेला हा ऐतिहासिक विजयच म्हणावा लागेल.
फडणवीसांनी या निवडणुकीतील विजयाचे श्रेय टीम महायुती, टीम भाजपाला दिले. ते म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ही पहिली निवडणूक होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली घवघवीत यश मिळाले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व इतर नेत्यांनीही उत्तम समन्वय राखून काम केले.
ते पुढे म्हणाले, “भाजपने विकास, पारदर्शकता आणि सुशासन या मुद्द्यांवर निवडणूक लढवली आणि त्यालाच जनतेने पसंती दिली. विरोधकांनी नकारात्मक राजकारण केले, तर भाजपने कामाच्या जोरावर लोकांचा विश्वास संपादन केला.”
फडणवीसांनी सांगितले की, २०१७मध्ये आमचे १६०२ नगरसेवक होते. आता ३३२५ नगरसेवक आहेत. नगरसेवकांच्या संख्येमध्ये एकट्या भाजपाचे ४८ टक्के नगरसेवक आहेत. मात्र मी आमचे सहयोगी एकनाथ शिंदे, अजित पवार यांचेही मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पक्षांनीही उत्तम कामगिरी केली.
महायुतीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, “महायुतीने एकसंघपणे निवडणुका लढवल्या आणि जनतेने त्याला भरघोस पाठिंबा दिला. येणाऱ्या काळातही महायुती महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र काम करेल.”







