पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवामुळे ममता बॅनर्जी प्रचंड निराश झाल्या असून अजूनही त्यांनी आपला पराभव मान्य केलेला नाही. आपला नैतिक विजय झाल्याचे सांगत आपण राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बनर्जी यांनी निकालात छेडछाड करण्यात आली असल्याचे म्हणत “नैतिक विजय” मिळाल्याचा दावा केला. त्या म्हणाल्या, “मी राजीनामा देणार नाही. मी हरले नाही आणि मी राजभवनात जाणार नाही. तो प्रश्नच येत नाही. आम्ही ही निवडणूक हरलो नाही; आम्हाला जबरदस्तीने हरवण्याचा प्रयत्न झाला. अधिकृतरीत्या आम्हाला हरवण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर केला जाऊ शकतो, पण नैतिकदृष्ट्या आम्ही जिंकलो आहोत.”
भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवत २०६ जागा जिंकल्या आणि राज्यातील टीएमसीची १५ वर्षांची सत्ता संपवली आहे. ममता बनर्जी यांनी मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत सुमारे १०० जागा त्यांच्या पक्षाकडून “हिरावून घेतल्या” गेल्याचा दावा केला. त्यांनी थेट भारतीय निर्वाचन आयोग वर निष्पक्ष निवडणूक घेण्यात अपयश आल्याचा आरोप केला. त्यांच्या मते मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत छेडछाड झाली आणि अधिकारी पक्षपातीपणे वागले.
त्यांनी असेही म्हटले की त्यांच्या टीमला आणि मतमोजणी प्रतिनिधींना काही महत्त्वाच्या क्षणी योग्य प्रवेश देण्यात आला नाही, ज्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले. “आम्हाला आत का जाऊ दिले नाही? प्रक्रिया कोण नियंत्रित करत होते?” असा सवाल त्यांनी केला.
गंभीर आरोप करत त्यांनी सांगितले की एका मतदान केंद्रावर त्यांच्यावर शारीरिक हल्ला झाला. “मला लाथ मारून बाहेर फेकले,” असे त्या म्हणाल्या आणि हा अनुभव अपमानास्पद असल्याचे नमूद केले. त्यांनी कायदा अंमलबजावणी यंत्रणा निष्क्रिय राहिल्याचाही आरोप केला.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातील सहकारी बँकांवर आरबीआयचा दंड
लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल नाही
प. बंगालमधील भाजपाच्या प्रचंड विजयानंतर अनेक वर्षे बंद असलेले दुर्गा मंदिर खुले
मावळत्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवरही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप करत लोकशाही संस्थांवर दबाव असल्याचे सांगितले. त्यांनी इशारा दिला की, अशा प्रकारच्या गोष्टींमुळे देशभरातील विरोधकांचा आवाज कमकुवत होऊ शकतो.
पराभवानंतरही त्यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की त्या आपली राजकीय लढाई सुरू ठेवतील. “मला खुर्चीची चिंता नाही, मला जनतेची आहे. आम्ही परत लढू,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी तथ्य शोध समिती स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच विरोधी पक्षांनी एकत्र राहण्याचे आवाहन करत इंडी गठबंधन एकत्र येऊन एकपक्षीय व्यवस्थेविरुद्ध लढेल असेही त्यांनी सांगितले.
ममता बॅनर्जी यांनी निकाल स्वीकारण्यास नकार देत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केल्याने, पश्चिम बंगालमध्ये पुढील काळात राजकीय तणाव वाढण्याची शक्यता दिसत आहे, तर भाजप आपला ऐतिहासिक विजय साकार करत सत्तेची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत आहे.







