28 C
Mumbai
Thursday, August 18, 2022
घरराजकारणसंजय राऊत खलनायक कसे?

संजय राऊत खलनायक कसे?

Related

शिवसेनेच्या हातून सत्ता गेल्यानंतर पक्षही जातोय असे चित्र दिसते आहे. पडझड सुरू झाली आहे, ती थांबण्याचे नाव नाही. डोंगरावरून घरंगळणारा धोंडा पायथ्यापाशीच जाऊन थांबतो, तसे काहीसे होत चालले आहे. कोसळणाऱ्या या डोलाऱ्याचे खापर शिवसेना नेते संजय राऊतांवर फोडले जात आहे. परंतु हे खरे नाही. राऊतांना दोष देणे म्हणजे सिनेमातील गाणी हिट झाली म्हणून पार्श्वगायकाला बाजूला ठेवून नायकाचे कौतूक करण्यासारखे आहे.

विधानसभेत ज्या दिवशी भाजपा-शिवसेना सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला त्या दिवशी गुलाबराव पाटील यांनी घणाघाती भाषणात संजय राऊतांना ठोकून काढले. त्यानंतर आणि आधीही शंभूराज देसाई, दीपक केसरकर असे अनेक आमदार राऊतांवर तुटून पडताना दिसतायत. त्यांच्या बेताल बडबडीमुळे शिवसेनेचा कडेलोट झाल्याचा आरोप करतायत. राऊतांना शिवसेनेचा खलनायक ठरवण्यात येत आहे. हे आरोप बिनबुडाचे आहेत, असे कोण म्हणेल? पण हे केवळ अर्धसत्य आहे.

राऊत हे सुरूवातीला सामनाचे पगारी संपादक होते, त्यानंतर ते शिवसेना नेते आणि खासदार झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकाळात ते नेत्याला हवे असलेल्या शैलीत लिहायचे, उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्ता आल्यानंतर त्यांनी शिवसेनेसाठी बोलायला सुरूवात केली. ते इतकं बोलू लागले की शिवसेनेकडे बोलणारा दुसरा माणूसच नाही असा संशय लोकांना येऊ लागला. पण राऊत जे बोलत होते ते शब्द उद्धव ठाकरे यांना अपेक्षित असलेलेच होते. २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युती तुटली. तरही भाजपाला जास्त जागा मिळाल्या. पूर्ण बहुमत नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने एकतर्फी पाठींबा जाहीर करून शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपवली आणि शिवसेनेला नाकमुठीत घेऊन सरकारमध्ये सामील व्हावे लागले.

गृह, अर्थ, नगरविकास, महसूल अशी सगळी महत्वाची खाती स्वत:कडे ठेवून भाजपाने सरकावर मजबूत पकड सिद्ध केली होती. शिवसेनेच्या वाट्याला आरोग्य, उद्योग अशी फुटखळ खाती आली. शिवसेनेला निवडणुकीत कमी जागा मिळाल्या म्हणून दुखावलेल्या उद्धव ठाकरे यांचा अहंकार अधिकच रक्तबंबाळ झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मोठा भाऊ म्हणून मिरवत असलेल्या शिवसेनेला छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागते आहे, याची बोच त्यांना अस्वस्थ करीत होती. भाजपा आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या द्वेषाचे विषय बनले.

फडणवीस यांचे युतीच्या या सरकारवर पूर्ण नियंत्रण असले तरी शिवसेनेचा सरकारला टेकू होता. शिवसेनेने नेमका याचाच फायदा उठवला. सामनातून भाजपा सरकारवर जहरी टीका सुरू झाली. भाजपाला काय वाटते याची फिकीर करण्याची शिवसेनेला गरज नव्हती. कारण शिवसेनेचा पाठींबा सरकारसाठी गरजेचा होता. त्यामुळे अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विरोधात सामनातून विखारी टीका होत असून उद्धव ठाकरे यांनी सूचक मौन पाळले. संजय राऊत हे भाजपाच्या टीकेचे धनी होते. परंतु उद्धव यांच्या मूकसंमती शिवाय संजय राऊत अशी भाषा वापरू शकतील का, हा प्रश्न मात्र कुणाच्याही मनात येत नव्हता.

पूर्वी फक्त अग्रलेखांपुरते मर्यादीत असलेले संजय राऊत माध्यमांसमोर येऊन भाजपाला झोडू लागले. युतीच्या सरकारमध्ये सामील असताना राऊत मित्रपक्षाला असे तुडवत असताना उद्धव यांना यातही काही वावगे वाटले नाही. किंबहुना राऊत त्यांच्या सूडाचा कंड शमवत असल्यामुळे मनातून त्यांना गुदगुल्याच होत होत्या. राऊत यांचा हत्यार म्हणून वापर होत होता, तो तसा करू दिल्यामुळे राऊतांना बक्षीशी मिळत होती. शिवसेनेतील त्यांचे वजन वाढत होते.

संजय राऊत अशी बडबड करताना उद्धव मूक पाठिंबा का देत होते? कारण उद्धव ठाकरे यांच्या मनात भाजपाचा द्वेष होताच. राज्यात भाजपाचे बळ वाढत होते, २०१४ मध्ये भाजपाला शिवसेनेच्या तुलनेच मोठे यश मिळाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यामुळे ठाकरे यांचा द्वेष अधिक विषारी आणि विखारी झाला. एकेकाळी राज्यात छोटा भाऊ म्हणून वावरत असलेला भाजपा राज्याच्या सत्तेवर येतो आणि शिवसेनेला दुय्यम भूमिका घ्यावी लागते याची प्रचंड सल उद्धव ठाकरे यांच्या मनात होती. त्यामुळे एका बाजूला सामनातून भाजपावर विखारी टीका करताना उद्धव ठाकरे मेट्रो कारशेड, नाणार, बुलेट ट्रेन अशा महत्वाच्या प्रकल्पात खोडा घालत होते. हे सर्व प्रकल्प केंद्राचा सहभाग असलेले होते, हे महत्वाचे.

उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहे, याचा सुगावा संजय राऊतांना आधीच लागला होता. राऊतांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी असलेली जवळीक सर्वश्रुत होती. संसदेच्या अधिवेशन काळात संजय राऊत सतत शरद पवार यांच्यासोबत दिसत असत. दुपारच्या भोजन अवकाशाच्या वेळी राऊत रोज पवारांच्या कारमध्ये बसून ६ जनपथवर जेवायला जातात, ही देखील नित्याची बाब. हा अगदी उघड मामला होता. त्यात राऊतांनी कधी लपवाछपवी केली नाही. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर राऊत यांनी उघडपणे पवारांचे जाहीर कौतूक करायलाही सुरूवात केली. शिवसेनेचे खासदार याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे वारंवार तक्रार करीत असत, परंतु उद्धव यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. कारण शिवसेनाप्रमुखांच्या काळात पवार हे शिवसेनेचे विरोधक होते, शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्यानंतर शिवसेनेची स्पर्धा भाजपाशी सुरू झाली. फरक फक्त एवढाच होता की पवार विरोधक म्हणून भाजपाच्या समोर उभे होते आणि शिवसेना मित्रपक्षाचा मुखवटा घालून सोबत उभी होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुरेपुर वापरला. परंतु आतमध्ये वेगळंच काही शिजत होतं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाला १०५ जागा मिळाल्या, शिवसेना ५६ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आली, राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ तर काँग्रेसच्या वाट्याला ४४ जागा आल्या. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा सरकार बनवण्याची तयारी करत होती, तेव्हा शिवसेना भाजपाला बाजूला ठेवून मुख्यमंत्रीपद काबीज करण्याची तयारी करत होती. मुख्यमंत्री शिवसेनेचाच बनणार, असे संजय राऊत वारंवार बोलत होते, शरद पवारांशी चर्चा करीत होते, त्याला उद्धव ठाकरे यांची संमती नव्हती असे मानणे म्हणजे मूर्खपणा आहे. त्यामुळे भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा दोषही उद्धव यांच्याकडे कमी आणि राऊतांकडे जास्त गेला.

महाराष्ट्रात सत्तांतर नाट्य घडत असताना आधी उद्धव ठाकरे विरोधकांच्या बापावर गेले. नाव वापरायचं असेल तर तुमच्या बापाचं वापरा माझ्या बापाचं नको, ही सुरूवात उद्धव यांनी केली. संजय राऊतांनी ती पुढे नेली. एका बापाचे असाल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, हे संजय राऊतांचे विधान. गुलाबराव पाटलांना पुन्हा पान टपरीवर बसवू, हे संजय राऊतांचे शब्द, पण तेही उद्धव ठाकरे यांच्या मनातलं बोलले. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर टिप्पणी करताना काल ब्रेक फेल झाल्यामुळे रिक्षावाला सुसाट होता, हे विधान करून उद्धव ठाकरे यांनी सिद्ध केलं.

संजय राऊत हे कायम उद्धव ठाकरे यांच्या मनातलं बोलले त्यामुळे ते चौथ्यांदा खासदार झाले. शिवसेनेतील नंबर दोनचे नेते बनले. संजय राऊत जे बोलतायत ते शिवसेनेचे धोरण मानले जाते कारण ते उद्धव यांच्या मनातलंच बोलतात.
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे आपण चाणक्य असल्याचा राऊतांचा समज झाला, विश्वासघात हीच चाणक्य नीती आणि बेताल बडबड हेच राजकारण अशी भावना झाल्यामुळे राऊत सुटले, वाहवत गेले. परंतु त्यांची अतिरेकी भूमिका ही उद्धव यांच्या धोरणाशी सुसंगत होती.

हे ही वाचा:

‘काली’ चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरवरून संग्रहालायने मागितली माफी

पंढरपूरसाठी आषाढीला जाणाऱ्यांना आता टोलमाफी

मुख्यमंत्री भगवंत मान बनणार ‘दुल्हेराजा’

शिवसेना आमदारांनंतर शाखाप्रमुखांची राजीनामा मालिका

 

सत्ता गमावल्यानंतर सगळेजण राऊतांवर ठपका ठेवत आहेत. परंतु त्यात तथ्य नाही. राऊत कोणाच्या इशाऱ्यावरून बोलतायत हे गुलाबराव पाटील, शंभूराजे आणि एकनाथ शिंदे यांनाही माहीत आहे. पण ठाकरे या आडनावाला असलेल्या वलयामुळे ते उद्धव ठाकरे यांना टार्गेट करू शकत नाहीत म्हणून संजय राऊतांना खलनायक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संजय राऊत ही उद्धव ठाकरे यांची सोय होती. त्यामुळेच शिवसेनेकडून भाजपा नेत्यांवर अनर्गल टीका होत असताना करताना माध्यमांकडून उद्धव ठाकरे यांना संयमी आणि विचारी नेत्याचा मुखवटा बहाल करण्याचे धाडस होत होते.
थ्री इडीयट सिनेमात लायब्रेरीयन दुबेच्या तोंडी एक डायलॉग आहे, सर बोल वो रहे है, लेकीन शब्द हमारे है…
शिवसेनेतही गेली अडीच वर्षे हेच होत होते. सिनेमात चतुरला प्रिन्सिपॉलचे फटके पडतात आणि दुबे बेशुद्ध होतो. इथेही तेच घडते आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
23,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा