मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. त्यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे काही नवीन नाही. मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरणच आहे. त्यामुळे त्यात काहीच नवीन नाीही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. यावेळी त्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारवर जोरदार टीका केली. १५ वर्ष सत्ता असताना ज्यांनी धनगर आरक्षण दिलं नाही, त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर उगाच टीका करू नये. फडणवीसांनी जोपर्यंत धनगरांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आदिवासींना ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती धनगरांना लागू केल्या होत्या. त्यामुळे आता या सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यावी, असं आवाहन खोत यांनी केलं.
ओबीसीच्या डेटावरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्राकडे जो डेटा तो यांच्याच सरकारमधला डेटा आहे. त्यात खूप सार्या चुका आहेत. त्यामुळे तो डेटा देऊ शकत नाही असे सांगितल्यानंतर सुद्धा त्या संदर्भात मागणी का होत आहे हाच महत्त्वाचा प्रश्न आहे?, असा सवालही त्यांनी केला. सरकारने राज्य मागास आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे त्यांनी हा डेटा गोळा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
हे ही वाचा:
मंत्रालयात दारूच्या बाटल्या ही काळीमा फासणारी घटना
आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?
नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान
यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊतांनी भाजपाबाबत बोलण्यापेक्षा स्वतःच्या सरकार संदर्भात बोलावं. राऊतांनी पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांसाठी मदतीला जावं. मग त्यांना त्यांच्या वेदना कळतील. त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत यात्रा काढावी, असा सल्लाही त्यांनी राऊतांना दिला.







