मणिपूर येथे आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. मतदानाचा हा दुसरा टप्पा असून एकूण सहा जिल्ह्यात आज मतदान होत आहे. पण अशातच मतदान केंद्राबाहेर गोळीबार होऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मतदानाला गालबोट लागले आहे.
मणिपूरमधील करोंग मतदार संघात हा प्रकार घडला आहे. करोंग मतदारसंघात मतदान सुरू असतानाच अचानक गोळी झाडण्याचा आवाज आला. गोळीबाराच्या या आवाजाने मतदान केंद्रावर एकच धावपळ उडालेली पाहायला मिळाली. मतदारांमध्ये भीतीचे वातावरण असून नेमके काय घडले हे कोणालाच कळले नाही. पण त्यानंतर गोळीबार होऊन त्यात एका युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर मतदान केंद्रावरील सुरक्षारक्षकानेच गोळी चालवल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या एका उमेदवाराने ही माहिती दिल्याचे समजते. मतदान केंद्रावरील सुरक्षारक्षकाने गोळी झाडली असून त्यात हा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. पण गोळी मारण्या मागचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.
हे ही वाचा:
युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या या अटी
…आणि लिबियातून भारतीयांची जलदगतीने सुटका केल्याच्या बतावणीत काँग्रेस मग्न
रशिया काही तास बॉम्बवर्षाव करणार नाही…हे आहे कारण!
हिंदू मतांवर डोळा ठेवून काँग्रेस, सपा नेते काशी विश्वनाथ मंदिरात
दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर मतदान केंद्रावर आणि नागरिकांमध्ये एकच घबराट पाहायला मिळाली आहे. तर सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता मतदान केंद्रावरील पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात आज जवळपास सहा जिल्ह्यातील २२ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. या २२ जागांवर मिळून एकूण ९२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर १२४७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.







