पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील गुप्तारबागान भागात रविवारी रात्री झालेल्या एका बाँबस्फोटात एका १८ वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भातपारा महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १७ च्या गुप्तरबागान परिसरातील मोतिभाबान शाळेच्या जवळ हा प्रकार घडला. हा संपूर्ण परिसर जगदल पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव अनुराग साहू असल्याचे कळले आहे. हा बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.
हे ही वाचा:
ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहोचली
अमेरिकेतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची देखील मदत
कांगावाखोरांनी रोज सकाळी कांगावा करणं बंद करावं
अनुरागने जेव्हा बाँबच्या धमाक्याचा आवाज ऐकला तेव्हा तो जखमी झाला होता. त्याला भातपारा येथील सरकारी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले, परंतु तेथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यु झाला होता. या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.
काल ही घटना घडली आणि दुसरीकडे आज बंगालमधील सातव्या टप्प्याचे मतदान चालू आहे. या टप्प्यात एकूण २६८ उमेदवारांचे ज्यात ३७ महिला उमेदवारांचा देखील समावेश आहे, त्यांचा निवाडा होणार आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीला प्रारंभ २७ मार्चपासून झाला. एकूण आठ टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या मतदानाचे सहा टप्पे यापूर्वीच पार पडले आहेत. या निवडणुकीचा निकाल २ मे रोजी लागणार आहे. या संपूर्ण निवडणुक प्रक्रियेदरम्यान कमी- अधिक प्रमाणात हिंसाचाराच्या घटना दुर्दैवाने पहायला मिळाल्या.