“पक्षाचे नेते, नवनियुक्त उपनेते सभागृहात अनुपस्थित”

राघव चढ्ढा यांची राज्यसभेत स्वतःच्या पक्षावरच टीका

“पक्षाचे नेते, नवनियुक्त उपनेते सभागृहात अनुपस्थित”

आम आदमी पार्टीचे (आप) खासदार राघव चड्ढा यांनी शुक्रवार, १७ एप्रिल रोजी राज्यसभेतील आपल्याच पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली. गेल्या काही दिवसांपासून आप आणि राघव चड्ढा यांच्यातील संघर्ष सातत्याने चव्हाट्यावर येत आहे. अशातच आता पुन्हा एकदा राघव चड्ढा यांनी पक्षावर टीका केली आहे. वरिष्ठ सभागृहातील प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधत त्यांनी स्वतःच्या उपस्थितीचा उल्लेख केला. चड्ढा म्हणाले की, पक्षाचे नेते आणि नवनियुक्त उपनेते दोघेही सभागृहात उपस्थित नव्हते, तर दुसरीकडे नुकतेच उपनेतेपदावरून हटवण्यात आलेले ते स्वतः उपस्थित होते.

राघव चड्ढा म्हणाले की, “मी ज्या पक्षाचा आहे, त्या पक्षाचे नेते सभागृहात उपस्थित नाहीत. मी ज्या पक्षाचा आहे, त्या पक्षाचे नवनियुक्त उपनेतेही सभागृहात उपस्थित नाहीत. मी नुकताच पदच्युत झालेला उपनेता असून, मी सभागृहात उपस्थित आहे. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार,” असा टोला त्यांनी स्वतःच्याच पक्षाला लगावला. त्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या उपसभापतीपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल हरिवंश नारायण सिंह यांचे अभिनंदन केले.

अलीकडेच राघव चड्ढा यांना राज्यसभेतील ‘आप’च्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले, पक्षाने सभागृहातील त्यांचा बोलण्याचा वेळही कमी केला आहे. या घडामोडीमुळे, या निर्णयावरून पक्षात मतभेद असल्याची अटकळ बांधली जात आहे. सुरुवातीला पक्षाने या बदलाला एक सामान्य संघटनात्मक फेरबदल म्हटले असले तरी, लवकरच त्याचे रूपांतर एका सार्वजनिक वादात झाले. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राघव चड्ढा यांचे मौन आणि काही संसदीय आंदोलनांमध्ये सहभागी होण्याची त्यांची अनिच्छा, ही कारणे देत पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर तडजोड केल्याचा आणि पक्षाच्या भूमिकेचे पालन न केल्याचा आरोप केला. ‘आप’ने असाही आरोप केला की, त्यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करणे टाळले.

हे ही वाचा:

१५ लाखांचे बक्षीस असलेला सहदेव महतोसह चार नक्षलवादी ठार

लाल किल्ला स्फोटप्रकरणातील ‘टेरर मॉड्युल’चा पर्दाफाश

‘रामायणा’वर वादग्रस्त विधान केल्याबद्दल प्रकाश राज यांच्यावर गुन्हा

इराण युरेनियमचा साठा सोपवण्यास सहमत

राघव चड्ढा यांनी आपल्या संसदीय कामकाजाची कागदपत्रे सादर करत, “माझे कामच बोलेल,” असे ठामपणे सांगितले. त्यांनी हे आरोप “खोटे” असल्याचे सांगत फेटाळून लावले आणि संसदेतील आपली भूमिका सार्वजनिक प्रश्न उपस्थित करण्याची आहे, व्यत्यय आणण्याची नाही, असे स्पष्ट केले. राघव चड्ढा आणि पक्षादरम्यान झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर काही दिवसांनी, पंजाब सरकारने बुधवारी त्यांची ‘झेड-प्लस’ श्रेणीची सुरक्षा काढून घेतली. त्यानंतर लगेचच, केंद्राने त्यांना ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा प्रदान केली.

Exit mobile version