29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर राजकारण भेट लागी जिव्हारी

भेट लागी जिव्हारी

Related

या आठवड्याच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मेट्रोला हिरवा झेंडा दाखविण्यात व्यस्त असताना त्यांच्या खुर्चीचा दांडा हलतो की काय? अशी चर्चा माध्यमांवर आणि समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. त्याला कारणही तसेच होते. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी गेले होते. २०१४ चा बाहेरून पाठिंबा आणि २०१९ चा पहाटेचा शपथविधी हा इतिहास नजरेसमोर ठेवता महाराष्ट्रात भाजपा अधिक राष्ट्रवादी या सत्ता समीकरणाची अनेकदा चर्चा झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस-पवार भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण येणे यात काहीच नवल नव्हते. पण ही केवळ सदिच्छा भेट असून पवारांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

खरं तर या स्पष्टीकरणानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळायला हवा होता. काही प्रमाणात माध्यमांवरील चर्चांना तो मिळालाही, पण या भेटीमुळे शिवसेनेच्या गोटात मात्र चांगलीच खळबळ माजल्याचे जाणवत आहे. सुरुवातीला या भेटीवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि सामनाचे संपादक यांच्या देहबोलीतून ते प्रकर्षाने जाणवले आणि आता तर ते आणखीनच अधोरेखित झाले आहे. कारण या एका साध्या सदिच्छा भेटीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने आपले अख्खे एक संपादकीय खर्ची घातले आहे. त्यामुळे जी भेट मुळातच राजकीय स्वरूपाची नव्हती असे स्वतः फडणवीस सांगतात, अशा भेटीवर राऊतांना लेखणी का झिजवावी लागली? हा प्रश्न उद्भवतो.

महाराष्ट्राचे सरकार खंबीर आहे आणि ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल याची दर दिवशी जपमाळ ओढणारे सामनाचे संपादक हे फडणवीस-पवार यांच्या एका अनौपचारिक भेटीमुळे एवढे बेचैन का व्हावेत? ही बाब विचार करण्यासारखी आहे. चारशे-पाचशे शब्दांच्या सामनातील अग्रलेखाचा सारांश दोन वाक्यात सांगायचा, तर सरकार कसे स्थिर आहे आणि शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचीच कशी शिकवणी घेतली असेल हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न सामनाने केला आहे. राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्राला उत्तम विरोधी पक्षनेत्यांची परंपरा लाभली आहे. शरद पवार हे देखील त्यातील एक होते आणि सध्याचा विरोधी पक्ष हा बेभान झाला आहे.

पण आजवर साऱ्या महाराष्ट्राने पाहिल्याप्रमाणे राऊतांच्या मतांचा आणि वास्तवाचा संबंध कधीच नसतो. तेच इथे पुन्हा एकदा पाहायला मिळते. वास्तविक सध्याचा विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही एक नवा आदर्श जनतेसमोर ठेवत आहेत. गेल्या दीड वर्षात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या घराचा उंबरा क्वचितच ओलांडला असेल. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे क्वचितच घराच्या उंबऱ्याआड राहिले असतील. फडणवीस राज्यात फिरत आहेत, जनतेत मिसळत आहेत, लोकांना भेटत आहेत, त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत आणि त्यानुसार जनतेच्या मागण्या सरकारकडे लावूनही धरत आहेत. कोविड महामारीच्या या परिस्थितीत ठाकरे सरकारचा भोंगळ कारभार सारा महाराष्ट्र अनुभवत आहे. फेसबुक लाईव्ह आणि केंद्रावर जबाबदारी ढकलणे या व्यतिरिक्त मुख्यमंत्री काहीच करताना दिसत नाहीयेत. तर दुसरीकडे फडणवीस यांचे झंझावती दौरे सुरु आहेत. ते कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात फिरले. तर निसर्ग आणि तौक्ते वादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठीही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले. मंगळवार, १ जून रोजी बहुदा जेव्हा संजय राऊत सामनासाठी अग्रलेख खरडत होते, तेव्हा फडणवीस जळगावात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकत होते. हे कमी की काय म्हणून तिथल्या शिवसैनिकांनीही फडणवीस यांचा ताफा अडवून त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा केली. ही गोष्ट खूपच बोलकी आहे.

हे ही वाचा:

परदेशी लशींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

सुशांत सिंह राजपूत प्रकरण, ड्रग पेडलर हरीश खानला अटक

आता कोरोनामुळे मृत झालेल्यांना ४८ तासांत मिळणार ५० लाख

आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

महाराष्ट्राचे वसुली रॅकेट ज्या सचिन वाझेमुळे बाहेर आले, ज्याची वकिली स्वतः मुख्यमंत्री करत होते, त्या वाझेचे प्रकरण बाहेर काढणारे आणि लावून धरणारे विरोधी पक्षनेते फडणवीस हेच होते. विरोधी पक्ष सरकारवर इतका अंकुश ठेवून आहे की अत्तापर्यंत सत्ताधारी पक्षातील दोन प्रमुख मंत्र्यांना राजीनामा देऊन घरी बसायची वेळ आली आहे आणि बहुदा तिसरे मंत्री अनिल परब हे देखील त्याच मार्गावरून जात आहेत.

त्यामुळे पवारांनी फडणवीसांना विरोधी पक्ष नेत्याने कसे काम करावे याविषयी चार गोष्टी सांगितल्या असतील याची शक्यता तशी धुसरच दिसते. उलट शिवसेनाला पाच वर्ष सहन करण्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या फडणवीसांकडूनच पवारांनी त्यासंबंधीच्या मार्गदर्शनाची अपेक्षा केली असेल तर त्यात काही नवल नाही.

अग्रलेखात राऊत एके ठिकाणी म्हणतात फार दिवसानंतर फडणवीस एका योग्य व्यक्तीला भेटले. बहुदा राऊतांच्या मते याआधीची योग्य व्यक्तीची भेट म्हणजे त्यांच्यासोबतची ती हॉटेलमधली भेट असावी. त्या भेटीची कहाणी आठवायची तर त्या भेटीमुळे राष्ट्रवादी अथवा काँग्रेस पक्षाला फार काही फरक पडल्याचे अजिबात जाणवले नव्हते. वास्तविक सध्याच्या महाविकास आघाडी सरकारचे खरे शिल्पकार हे तर संजय राऊत आहेत. पण तरीही फडणवीस-राऊत भेटीमुळे इतर दोन पक्षांना कसलीच चिंता वाटत नव्हती. मग पवारांसोबतच्या भेटीमुळे शिवसेनेचे बीपी का वाढावे? की पवारांना पुरते ओळखून असल्यामुळे राऊतांना घाम फुटला असावा?

देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट शिवसेनेच्या इतकी जिव्हारी लागली आहे की खासदार, संपादक असणारे संजय राऊत हे थेट ‘सीआयडी’च्या भूमिकेत गेले आहेत आणि या भेटीचे तथ्यहीन रहस्य त्यांनी आपल्या लेखणीतून उलगडले आहे. पण राऊतांच्या या ‘शोधपत्रकारितेमुळेच’ एक गोष्ट स्पष्ट झाली आहे… दया कुछ तो गडबड है!!

– स्वानंद गांगल
(मुख्य उपसंपादक, न्यूज डंका)

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर नव्या समीकरणांची जुळवाजुळव होऊ शकते.
    अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करण्यालाच राजकारण म्हणतात.तसे ही आघाडीतील असलेला अंर्तविरोध व प्रचंड या कलहातुनच ऊद्धव ठाकरे हे कधीही महाराष्ट्र्राचे “कुमारस्वामी ” ठरतील..शेवटी स्वार्थाने झालेली कुठलेही जोडणी दिर्घकाळ टिकत नाही. हे नजीकच्या काळात दिसण्याची शक्यता गडद आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा