महाराष्ट्राचे माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “हा निव्वळ अपघात आहे. या घटनेला राजकारणाची किनार देणे योग्य नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी अफवा व तर्क-वितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
शरद पवार म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार ही घटना तांत्रिक किंवा हवामानाशी संबंधित कारणांमुळे घडली असण्याची शक्यता आहे. अशा प्रसंगी तपास यंत्रणांना आपले काम करू द्यावे, निष्कर्ष येईपर्यंत कोणतेही आरोप-प्रत्यारोप करणे गैर आहे. “अपघातानंतर तत्काळ मदतकार्य राबवले गेले, संबंधित सर्व यंत्रणा सज्ज होत्या, हे समाधानकारक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा:
आता फ्रेंच वाईन भारतात स्वस्त मिळणार
अरिजीत सिंहचा पार्श्वगायनाला रामराम, श्रेया घोषाल यांचा पाठिंबा
‘पहिल्या २५ वर्षांत भारताने अनुभवली यशस्वी वाटचाल, अभिमानास्पद कामगिरी’
अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी होणार अंत्यसंस्कार
राज्यभरात या वृत्तानंतर शोक व्यक्त केला जात असतानाच अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या (गुरुवार, २९ जानेवारी) त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देखील बारामतीत अजित पवारांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवार, २९ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणले जाणार आहे. यापूर्वीच मैदान परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. अंत्यसंस्कारावेळी अजित पवारांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे. बारातमीमध्ये उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.







