केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला मोठे यश मिळाले असून भारताचे संरक्षण उत्पादन आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये विक्रमी १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. २०२०-२१ च्या तुलनेत ही वाढ तब्बल ११० टक्के असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत विविध धोरणात्मक पावले उचलली आहेत. त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत संरक्षण उद्योगाने मोठी झेप घेतली असून भारत आता केवळ संरक्षण साहित्य आयात करणारा देश न राहता उत्पादन आणि निर्यातीच्या क्षेत्रातही वेगाने पुढे जात आहे.
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, संरक्षण उत्पादनातील ही विक्रमी वाढ ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांच्या यशाचे प्रतीक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उद्योगांसह खासगी क्षेत्रानेही या वाढीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशातील संरक्षण उत्पादन क्षमतेत सातत्याने वाढ होत असून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, रडार प्रणाली, नौदल उपकरणे आणि इतर लष्करी साहित्याच्या निर्मितीत भारत स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे.
संरक्षण उत्पादनाबरोबरच संरक्षण निर्यातीमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची संरक्षण निर्यात ३८,४२४ कोटी रुपयांवर पोहोचली असून ती आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत सुमारे ६२.६६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. भारतीय संरक्षण उत्पादनांवर जगभरातील देशांचा वाढता विश्वास या आकडेवारीतून दिसून येत असल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
हे ही वाचा:
‘इंडो-पॅसिफिक’ऐवजी पुन्हा ‘पॅसिफिक कमांड’! अमेरिकेचा निर्णय
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवरील रासायनिक लेपनास विरोध
जून २०२२ ची पुनरावृत्ती होणार? ठाकरे गटाचे खासदार फुटीच्या उंबरठ्यावर
विवान कारुळकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक भवनाची भेट
केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरणाला प्राधान्य देत आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याचबरोबर संरक्षण उत्पादनात खासगी उद्योगांचा सहभाग वाढविणे, संशोधन आणि विकासाला चालना देणे तसेच जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांना स्थान मिळवून देणे यावरही भर दिला जात आहे. भारताला संरक्षण उत्पादन आणि निर्यातीच्या क्षेत्रात जागतिक स्तरावरील प्रमुख देशांमध्ये स्थान मिळवून देण्याच्या दिशेने ही प्रगती महत्त्वपूर्ण मानली जात असून, आगामी काळात संरक्षण उद्योग देशाच्या आर्थिक आणि सामरिक शक्तीचा प्रमुख आधारस्तंभ ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.







