बेंगळुरूमध्ये काँग्रेसच्या रॅलीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तीन विद्यार्थिनी नीट यूजी पुनर्परीक्षेला मुकल्या. ही घटना बेंगळुरूतील आरसी गव्हर्नमेंट कॉलेज येथे घडली. परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार दुपारी १.३० वाजता नेमके बंद करण्यात आले होते. मात्र तीन विद्यार्थिनी १.३२ वाजता केंद्रावर पोहोचल्या आणि केवळ दोन मिनिटांच्या उशिरामुळे त्यांना प्रवेश मिळू शकला नाही.
दुपारी १.२९ वाजता सार्वजनिक ध्वनीप्रणालीवरून शेवटची सूचना देण्यात आली होती की मुख्य प्रवेशद्वार १.३० वाजता अचूक बंद केले जाईल. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थिनींनी मुख्य गेटचे रेलिंग ओलांडून केंद्राच्या आवारात प्रवेश केला. मात्र परीक्षा नियमांनुसार त्या वेळेपर्यंत परीक्षा हॉलचा प्रवेश बंद करण्यात आला होता. नंतर त्या मुली परीक्षा केंद्राच्या मुख्य दरवाजापाशी गेल्या पण त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे तिथे त्या मुली रडू लागल्या. त्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
विद्यार्थिनींच्या पालकांनी सांगितले की, त्या वेळेतच घरातून निघाल्या होत्या, परंतु शहरात काँग्रेसच्या रॅलीमुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्यांना उशीर झाला. दरम्यान, एमईएस पीयू कॉलेज येथेही अनेक नीट परीक्षार्थी शेवटच्या क्षणी परीक्षा केंद्रावर पोहोचले. वाहतूक कोंडीमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ केली.
नीट परीक्षेचे पेपर फुटल्यानंतर त्याविरोधात काँग्रेस आक्रमक होती. त्यांनी विविध ठिकाणी आंदोलने केली. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. पण आता मुलांची पुन्हा परीक्षा घेण्यात येत असताना त्यांनी काढलेल्या रॅलीमुळे तीन मुलींना परीक्षेला मुकावे लागल्यानंतर काँग्रेसच्या असंवेदनशीलतेवर टीका होत आहे.
बेंगळुरू दक्षिणचे भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी या घटनेवरून काँग्रेसवर टीका केली. त्यांनी म्हटले की, हजारो विद्यार्थी नीट पुनर्परीक्षा देत असताना काँग्रेसने त्याच दिवशी रॅली आयोजित करून विद्यार्थ्यांच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “काँग्रेस पक्षाने रॅलीसाठी दुसरा कोणताही दिवस निवडला असता, तर चालले असते. पण त्यांनी हजारो विद्यार्थी नीट परीक्षा देत असलेल्या दिवशीच कार्यक्रम घेतला. वाहतूक कोंडीमुळे अनेक विद्यार्थी उशिरा पोहोचले आणि काहींना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी विनवण्या कराव्या लागल्या.”
सूर्या यांनी काही विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन अतिरिक्त वेळ दिल्याबद्दल परीक्षा अधिकाऱ्यांचे आभारही मानले. तसेच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही विद्यार्थ्यांप्रती असंवेदनशील असल्याचा आरोप केला. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून विमानतळावरून आपल्या निवासस्थानी जाताना थांबण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
‘नीट’ परीक्षार्थींसाठी मोदी विमानतळावरच थांबले!
होणार तीर्थक्षेत्रांचा कायापालट, मिळणार संस्कृतीला नवी ओळख
पंढरीच्या वाटेवर धावणार ५,५०० विशेष बसेस
मोदींनी दाखवले प्रसंगावधान
पंतप्रधान मोदी दुपारी १.१५ वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचले होते. मात्र एसपीजी आणि पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासात अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी सुमारे ४५ मिनिटे विमानतळावरच थांबण्याचा निर्णय घेतला. दुपारी २ वाजता सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचल्यानंतरच ते विमानतळावरून रवाना झाले. ते ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून परतले होते.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए रविवारी नीटची पुनर्परीक्षा आयोजित करत आहे. मूळ परीक्षा ३ मे रोजी झाली होती, परंतु प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे ती रद्द करण्यात आली होती. परीक्षेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एनटीएने व्यापक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा कक्षांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यांचे सतत निरीक्षण केले जात आहे.
परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेशासाठी मेटल डिटेक्टरसह कडक तपासणी करण्यात आली. प्रत्येक वर्गात दोन निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर दहापेक्षा अधिक अधिकारी कार्यरत होते. प्रश्नपत्रिका वाहून नेण्याची जबाबदारी भारतीय नौदलाकडे होती. तसेच परीक्षा केंद्रांवर निमलष्करी दल आणि स्थानिक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासनाने कडक प्रतिबंधात्मक आदेशही लागू केले होते.
